मुंबई: यशस्वी जायसवालने बुधवारी मैदानावर येताच धमाका केला. संपूर्ण टी-२० वर्ल्डकपमध्ये बेंचवर बसल्यानंतर यशस्वीने झिम्बाब्वेविरुद्ध मैदानावर उतरताच आपल्या खेळाचा जलवा दाखवला. यशस्वी जायसवालने भारताला वेगवान सुरूवात करून दिली. या दरम्यान त्याने रोहित शर्माचा एक रेकॉर्डही तोडला. यशस्वीने सामन्यात २७ बॉलमध्ये ३६ धावांची खेळी केली.
भारताने झिम्बाब्वेला तिसऱ्या टी-२० सामन्यात २३ धावांनी हरवले. भारतासाठी या सामन्यात सर्वाधिक धावा कर्णधार शुभमन गिलने केल्या. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावा तडकावल्या. यामुळे भारताला झिम्बाब्वेविरुद्ध १८३ धावांची खेळी साकारता आली.
साधारण ४ महिन्यानंतर भारतीय संघासाठी खेळणाऱ्या यशस्वी जायसवालला या सामन्यात जरी अर्धशतकीय खेळी साकारता आली नसली तरी त्याने या दरम्यान एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
यशस्वी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षी तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ८४८ धावा केल्या. या सामन्याआधी २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर होता. मात्र आता यशस्वी जायसवाल अव्वल स्थानावर आला आहे.
जगातील इतर क्रिकेटर्सबाबत बोलायचे झाल्यास या यादीत यशस्वी जायसवाल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरानआहे. यानंतर कुसल मेंडिसचा नंबर लागतो. तर मेंडिससह रोहित शर्मा संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.