एमएमआरडीसीचा दावा ठरला फोल
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Highway) पाहिले जाते. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नसून समृद्धी महामार्ग खचत चालला असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhajinagar) जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ भेगा पडल्या आहेत. ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा व काही ठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गावर अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एमएमआरडीसीचा अंदाज फोल
महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावा एमएसआरडीसीने (MMRDC) केला होता. मात्र आता तो फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. तसेच माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघाताचे वाढते सत्र तसेच भेगा व खड्ड्यांसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र याबाबतीत प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे.
समृद्ध महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला होणार
समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी पैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.