Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीआषाढी वारीसाठी यंदा एसटी ५००० जादा गाड्या सोडणार

आषाढी वारीसाठी यंदा एसटी ५००० जादा गाड्या सोडणार

मुंबई : पंढरीच्या वारीची प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. आषाढी यात्रेनिमित्त श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

या प्रवासात देखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे, अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -