Tuesday, April 22, 2025

अशी ही यात्रा!

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

जसा घटाचा नाश झाला म्हणजे घटातील अवकाश भोवतालच्या अवकाशात एक होते, तसे मला शरण आलास म्हणजे माझ्याशी एकरूप होशील..’ ओवी क्र. १३९९

‘सुवर्णाचा मणी सुवर्णाशी जसा एकरूप असतो अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी ऐक्य पावते, तशा रीतीने हे धनंजया, तू मला ऐक्यभावाने शरण ये.’ ओवी क्र. १४००

‘जैसें घटाचेनि नाशें।
गगनीं गगन प्रवेशे।
मज शरण येणें तैसें।
ऐक्य करी॥’
‘सुवर्णमणि सोनया।
ये कल्लोळु जैसा पाणिया।
तैसा मज धनंजया। शरण ये तूं॥’

अठराव्या अध्यायात आलेल्या या अप्रतिम ओव्या! काय सांगू पाहतात यातून ज्ञानदेव? जगण्याचा मंत्र, जीवनाचं तंत्र! काय आहे ते? तर ईश्वराला शरण जाणं, आपली सर्व कर्मं त्याला अर्पण करणं. असं केल्यावर भक्त देवाहून वेगळा राहणार नाही. मग तो आनंदरूप होऊन राहील.

या विचारांची शिकवण देण्यासाठी, हे सूत्र समजावून सांगण्यासाठी दिलेले हे अप्रतिम, सुंदर दृष्टांत! पहिला दृष्टांत आहे घट आणि आकाशाचा. घट किंवा आपण ज्याला मडकं म्हणतो, त्यात असतं अवकाश. तो घट नाहीसा झाला की ते अवकाश, बाहेरच्या अवकाशात मिळून जातं. इथे घट म्हणजे माणूस होय. घट मातीचा बनलेला असतो. माणूसही पृथ्वी, आप इ. पंचतत्त्वांनी बनलेला असतो. हा घट नाहीसा होतो म्हणजे त्या माणसातील ‘मी’पण सरतं. तेव्हा तो अनंत अवकाश म्हणजे संपूर्ण जगाशी, परमेश्वराशी एकत्व पावतो.

यानंतरचा दाखला सुवर्णमणी व सोन्याचा आहे. सोन्याचा मणी हा सोन्याशी एक झालेला असतो. म्हणजे मण्यात सोनं असतंच. त्याप्रमाणे भक्त हा जणू सुवर्णमणी होय. सुवर्णमणी का? कारण सोनं हे तेजस्वी, दुर्मीळ, किमती आहे. त्याप्रमाणे जो भक्त ‘मी’पणारहित आहे, तोही सोन्याच्या मण्याप्रमाणे मौलिक, तेजस्वी होय. मग मणी सोन्याशी एकरूप, तसा हा भक्त ईश्वराशी एकरूप होतो.

पुढील दाखला ‘जल’तत्त्वाचा आहे. पाण्यावरील कल्लोळ म्हणजे पाण्याची लाट ही पाण्याशी एक झालेली असते. त्याचप्रमाणे भक्त शरण जाऊन देवाशी एकत्व पावतो. पाणी हे स्वच्छ, प्रवाही, जीवनदायी; नव्हे जीवनच असतं. त्याप्रमाणे ईश्वर आहे. या पाण्याची लाटही पाण्याप्रमाणे गुणधर्म असलेली. म्हणजे ज्या भक्ताने ‘मी’पणाला जिंकलं आहे, त्याचं मन हे पाण्याच्या लाटेप्रमाणे स्वच्छ, नितळ आहे.

या ओव्यांच्या अर्थात जितकी सुंदरता आहे, तितकीच त्या शब्दयोजनेत आहे. ही सुंदरता आली आहे-‘गगनी गगन’, ‘सुवर्णमणि सोनया’ या शब्दांच्या पुनरावृत्तीतून. गगन गगनात मिसळणं, सुवर्णमणी सोन्याशी एक असणं हा एकरूपतेचा प्रवास, नव्हे यात्रा आहे. ज्या भक्ताने ‘मी’पण टाकून दिलं आहे, ‘मी’ म्हणजे शरीर हा भाव सोडून दिला आहे, तो भक्त हा यात्रेकरू होय. तो परमेश्वराला शरण जाऊन त्याच्यापर्यंत पोहोचतो. नव्हे त्याच्याशी एक होतो.

हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला. माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’ रूपाने तो आपल्याला उलगडून, उकलून दाखवला. आता विचार आणि कृती आपण करायची, की केव्हा या यात्रेला सुरुवात करायची? केव्हा या वारीचा आरंभ करायचा?

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -