म्हणाल्या, ‘या प्रकरणात मला सरकारने…
वाशिम : गेल्या दोन दिवसांपासून पुणे (Pune) येथे कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी ३२ वर्षीय पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रचंड चर्चेत आल्या आहेत. पुण्यात केवळ प्रोबेशनरी अधिकारी असताना एखाद्या जिल्हाधिकाऱ्यालाही लाजवेल अशा सरंजामी थाटामुळे त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा खेडकर यांचे उत्पन्न, श्रीमंत थाट ते त्या सनदी अधिकारी होण्यास कशाप्रकारे पात्र नव्हत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. यानंतर आता त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारताना पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्याबाबत करण्यात आलेल्या सर्व चर्चा आणि आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा खेडकर यांनी म्हटले की, ‘मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय, इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल. मला सरकारने काहीही बोलण्यासाठी परवानगी दिलेली नाही’. यावेळी पूजा खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नावरुन, नॉन-क्रीमिलेअर सर्टिफिकेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर यांनी, ‘मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, या प्रकरणात मला सरकारने काही बोलायला परवानगी दिलेली नाही. मी आज वाशिमममध्ये रुजू झाली आहे’, असे खेडकर यांनी म्हटले. यानंतर पूजा खेडकर तिथून निघून गेल्या.
कसा होता पूजा खेडकर यांचा थाट?
पूजा खेडकर या महाराष्ट्र केडरच्या २०२२ च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता.
पूजा खेडकर शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार
IAS प्रोबेशनल अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यावरून थेट वाशिम येथे बदली करण्यात आली. ८ जुलै रोजी बदलीच्या आदेशानुसार खेडकर शासनाकडून रुजू करण्याचे आदेश काढण्यात आले होते. ९ तारखेला त्या संदर्भात पत्र वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मिळालं होतं. आज पूजा खेडकर यांनी प्रोबेशनल अधिकारी वाशिम जिल्हा अधिकारी बूवनेश्वरी एस यांची भेट घेऊन अधिकृतपणे आपला शिकाऊ उमेदवाराचा पदभार स्विकारला. आज जिल्ह्यातील सर्वच अधिकाऱ्यांची भेटी घेऊन उद्या पूजा खेडकर सार्वजनिक बांधकाम विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून चार्ज स्वीकारणार आहेत.