नाशिक : महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने (Maharashtra Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र नाशिकमध्ये (Nashik) हवा तितका पाऊस न झाल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) अजूनही कमालीची घट जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना दररोज पाणीकपातीच्या (Water Shortage) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच नाशिकमध्ये एक दिवसासाठी पाणी येणार नसल्यामुळे (Water Supply) नाशिककरांना पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील पाणीपुरवठा विभागाकडून मुकणे धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. मुख्य गुरुत्ववाहिनीवर देखभाल-दुरुस्तीचे व व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, व्हॉल्व्ह बदलणे तसेच गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून पूर्ण दिवस सुरु राहणार आहे. तसेच रविवारी होणारा सकाळचा पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
नाशिकमधील धरणातील पाण्यासाठ्यात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच वरुणराजाने पाठ फिरवल्यास शहराला भीषण पाणीबाणीला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.