Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणातील पावसाळा...!

कोकणातील पावसाळा…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणात पाऊस सर्वसाधारणपणे ७ जूनला सुरू होतो. गेल्या काही वर्षांतील बदलत्या हवामानात पावसाचे दिवस थोडे मागे-पुढे जरूर होतात; परंतु तरीही मृगनक्षत्राचा मुहूर्त चुकत नाही असं म्हटलं जातं. एकदा का मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस सुरू झाला की, मग कोकणातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं. सगळीकडे हिरवेगार वातावरण असतं. या हिरवळीचं एक वेगळं सृष्टीसौंदर्य आहे. डोळ्याचं पारणं फेडून टाकणारं हे निसर्गाचं रूपड हे खास कोकणचं वैशिष्ट्य आहे. कोकणातील हा निसर्गाने बहाल केलेला अलंकार फक्त तो कोकणालाच शोभून दिसतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पाऊस खरं तर सगळीकडचा सारखाच; परंतु तरीही कोकणात कोसळणारा, बरसणारा पाऊस त्याचीही एक वेगळीचं वैशिष्ट्यं आहेत.

कोकणात दीडशे इंच पाऊस पडतो. या पावसाळ्यात जे धबधबे असतात, त्यातून पाण्याची जी काही बरसात होते ती प्रत्यक्ष अनुभवण्यात एक वेगळाचं आनंद आहे. गेल्या काही वर्षांत ‘ढगफुटी’ हा शब्दप्रयोग पावसाच्या बाबतीत वापरला जाऊ लागला. ढगफुटीचा अनुभव अलीकडच्या काळात कोकणातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये हा विचित्र आणि जीवघेणा अनुभव घेतला जातोय. कोकणात पावसाळी हंगामात पाऊस गारवा निर्माण करतो; परंतु अलीकडे मात्र कोकणातला हा पाऊस संततधार पडून देखील हवेत मात्र उष्णताच असते. कोकणातील पावसाळ्यात कोकणवासीय खाद्य संस्कृतीचा वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेत असतात. कोकणातला पावसाळी शेती हंगाम असतो. या शेती हंगामात कोकणवासीय व्यस्त असतो. या व्यस्तेतही तो खाद्यसंस्कृती जरूर जपतो.

आजच्या पंचतारांकित आणि चायनिज खाद्यसंस्कृतीतही कोकणातलं कुळीथाचं पिठलं-भात, नाचणीची भाकरी याला कशाचीच तोड असू शकत नाही. पावसाळ्यात जसा तो वडे-सागोतीचा आस्वाद घेतो तसा कोकणवासीय नदी, खाडीचे मासे पकडून त्यावरही ताव मारतो. कोकणातील चाकरमानी मग तो परदेशात यूके, लंडनला असला आणि ज्याच लहानपण कोकणात गेलंय. शालेय, माध्यमिक शिक्षण कोकणात गेलेलं असेल तर तो परदेशात बड्या पदावर आणि मोठा पगार घेत असला तरीही जून, जुलै महिन्यात तो अस्वस्थच असणार. जर तो सहज म्हणून त्याला जरी त्याच कोकणातील खेडेगावातलं लहानपण आठवलं तरी तो इतका हरकून जाईल. मनाने तो अख्य कोकण अनुभवून जाईल इतकी कोकणातल्या खाद्यसंस्कृतीची समृद्धी आहे. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी कोकणात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गोरगरीब सर्वसामान्य रोजच्या जेवणात खाद्यपदार्थ सेवन करायचा आज त्याच ‘तृणधान्य’चं आरोग्याला आवश्यक असल्याचे जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे. या पावसाळी अधिवेशनातही विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये तृणधान्याचे अनेक पदार्थांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. मेतकूट, तिळकूट, शेंगदाणा चटणी, नाचणी, बरक यांची भाकरी अशा सर्वच पदार्थांची नाळ ही कोकणाशी जोडली गेलेली आहे.

कोकणातील मधल्या काळात कोकणातील ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांना नाक मुरडणारे आज कोकणातील याच ग्रामीण पदार्थांवर तुटून पडत आहेत. या पदार्थांमध्ये पुरेपूर पौष्टीकता आहे. पावसाळ्यात कोकणात येणाऱ्या रानभाज्यांची एक वेगळीच खाद्य संस्कृतीही आहे. कोकणात पावसाळ्यात तिसर अळू, बांबूचे कोंब, भारंगी, करटोली, फोडशी, टाकळा, तेराअळू, कुरडू, आंबाडा, रानकेळी, अळंबी, शेवरा, कुडा, सुरण, घोळ, पेवगा, शेंडवल अशा अनेक रानभाज्यांची नावं घेता येतील. या रानभाज्या म्हणजे देखील कोकणाला लाभलेली निसर्गदत्त देणी आहे. या रानभाज्या खऱ्या अर्थाने औषधी आणि गुणकारी आहेत. प्रत्येक रानभाज्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं एक वैशिष्ट्य आहे. त्याची उपयुक्तात कोकणवासीयांच्या आरोग्यासाठी अधिक महत्त्वाची ठरणारी आहे. आजकाल अळंबी पिकवली जातात; परंतु पावसाळी रानात मिळणाऱ्या अळंब्यांची टेस्ट कशालाही नाही. रानभाज्या आवडीने आणि शरीराला आवश्यक म्हणून सध्या गरीब, श्रीमंत सर्वच स्तरातील लोक खाऊ लागले आहेत.

आजच्या पिढीला कोकणातील या रानभाज्यांची अनेक नावं माहीतही नसतील. कदाचित… परंतु बहुतांश लोकांना या रानभाज्यांचं महत्त्व माहिती आहे. रानात उगवणारी अळंबी पहाणे आणि ती अळंबी दुसऱ्याच्या नजरेला येण्याअगोदर काढणे हा फार वेगळाचं अनुभव आहे. यातली एक गंमतही सांगतो, बऱ्याच वेळा ही अळंबी सापाचं वास्तव्य असणाऱ्या वारूळावर मोठ्या प्रमाणावर उगवतात. तर या अळंब्यावर साप विष टाकतो असं काही तरी पसरवून अळंबीबद्दल ज्यांना नीट माहिती नसते असे गैरसमज पसरवून ती अळंबी कोणी काढू नये याची जणू व्यवस्थाच लावून मोकळे होतात. कोकणातला पावसाळा हा असा भारून टाकणारा असतो. म्हणूनच सुप्रसिद्ध गीतकार, कवी मंगेश पाडगावकर यांनाही कोकणातील त्यांच्या वेंगुर्लेचा पाऊस त्यांना वेगळाच भासतो. म्हणूनच कोकणातील या वेंगुर्लेच्या या पावसाचे अतिशय सुरेख वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी करून ठेवले आहे. कोकणातला हा पावसाळा जसा तो कोकणवासीयांना अस्वस्थ करतो तसा तो ज्यांनी-ज्यांनी म्हणून कोकणातला पावसाळा अनुभवला आहे त्यांना तो निश्चितच हवाहवासा वाटतो. कोकणातल्या या पावसाळ्यातल्या अनेक गुजगोष्टी आणि गजाली या गावातल्या पारावर होतात. कोकणातला हा पाऊस अनेकवेळा कोकणवासीयांच्या अगदी अस्खलित मालवणीतून शिव्याही खातो. तो भरपूर कोसळला तरीही प्रॉब्लेम, नाहीच आला तरीही शिव्या असा हा फार गंमतीदार कोकणातला पावसाळा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -