Tuesday, March 18, 2025
Homeक्राईमWorli Hit and run case : वरळी अपघात प्रकरणातील मिहिर शाह आणि...

Worli Hit and run case : वरळी अपघात प्रकरणातील मिहिर शाह आणि ड्रायव्हरने दिली गुन्ह्याची कबुली!

केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे : मिहिर शाह

मुंबई : वरळीच्या अ‍ॅट्रिया मॉल परिसरात घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाने (Worli Hit and run case) राज्यभरात खळबळ उडवून दिली. एका कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला एका कारचालकाने समोरुन दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर नवरा थोडक्यात बचावला. या घटनेनंतर कारचालक अपघातस्थळावरुन फरार झाला. दरम्यान, हा कारचालक शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah) असल्याने या घटनेची वारंवार पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाशी तुलना केली जात होती.

फरार मिहिर शाहला पोलिसांनी मंगळवारी शहापूर येथून ताब्यात घेतले. त्याला या प्रकरणात शिक्षा होऊ नये यासाठी मदत करणाऱ्या आणखी १२ जणांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अपघातावेळी प्रत्यक्ष कार चालवताना कारमध्ये मिहिर शाह व ड्रायव्हर राजऋषी बिदावत हे उपस्थित होते. त्यांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं व आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी केलेल्या चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी राज्यभरातून मागणी होत आहे.

न्यायालयात आरोपींना सादर केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या उपस्थितीत प्रत्यक्ष अपघाताच्या रात्रीच्या समान क्रमाने एक दृश्य तयार केले. सीजे हाऊस वरळी ते सी लिंक वरळी असा देखावा पुन्हा तयार करण्यात आला. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

नेमकी कशी घडली होती घटना?

वरळी प्रकरणात अपघात झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला आणि अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत गेला. यामध्ये वडील राजेश शाह यांनीच मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचेही समोर आले होते. तसेच मुलाने कार चालवताना मद्यप्राशन केले होते की नाही याचाही तपास करण्यात आला. तो अपघातापूर्वी बारमध्ये तर गेला होता पण मात्र तो फरार झाल्याने रक्त तपासणी करुनही तो दारु प्यायला होता की नाही, हे सिद्ध होऊ शकत नाही. नेमकं काय झालं होतं ते क्रमाने जाणून घेऊयात.

शनिवारी रात्री तीन मित्रांसोबत मिहीर याने मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११.१५ च्या सुमारास हे चौघे या बारमधून बाहेर पडले. अपघात घडलेल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसले. ही गाडी बोरिवलीच्या दिशेने निघाली. बोरिवली परिसरातच राहणाऱ्या तिन्ही मित्रांना घरी सोडल्यावर मिहीरने चालक बिदावत याच्याकडे लाँग ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

गाडी मरीन ड्राईव्ह परिसरात आली. तेथून परत घरी जाताना मिहीरने गाडी चालविण्यास घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वरळी येथे मिहीरच्या गाडीने प्रदीप व कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेमुळे दोघे बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर आले. त्याच वेळी मिहीर याने ब्रेक दाबला. या झटक्यामुळे प्रदीप डाव्या बाजूने खाली पडले. मात्र कावेरी यांची साडी चाकात गुरफटली. त्यामुळे त्या बोनेटवरून सरकून चाक आणि बंपरमध्ये अडकल्या.

याची जाणीव कार चालविणाऱ्या मिहीरला आणि पेशाने चालक असलेल्या बिदावत याला होती. तरी त्याच अवस्थेत दोन किलोमीटर अंतर कापल्यावर मिहीरने गाडी थांबवली. चालकाच्या मदतीने कावेरी यांना बाहेर काढले. रस्त्यावर ठेवले. तेथे चालकाने गाडीचा ताबा घेतला. त्याने कावेरी यांच्यावरून पुन्हा गाडी चढवत पुढे नेली.

ही गाडी वांद्रे कलानगर येथे बंद पडली. तत्पूर्वी मिहीरने शिवसेनेचे उपनेते असलेल्या आपल्या वडिलांना, राजेश शहा यांना फोनवरून सर्व हकिगत सांगितली. मात्र मिहीरला पोलिस ठाण्यात पाठवण्याऐवजी शाह यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच अपघाताची जबाबदारी चालक बिदावत याच्यावर ढकलण्याचा कट आखला. शाह यांनी या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असलेली कारही गायब करण्याचा बेत आखला होता, मात्र वेळेत पोचलेल्या पोलिसांनी तो उधळला.

कलानगर येथून काही अंतर पायी गेल्यानंतर मिहीर याने रिक्षा पकडली. सीसीटीव्ही चित्रणातून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. कलानगर येथून तो गोरेगाव येथे राहणाऱ्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे सुमारे दोन तास त्याने झोप काढली. त्यानंतर तेथे आलेल्या बहिणीने मिहीर याला आपल्यासोबत नेले. गोरेगाव येथून तो बोरिवली येथे आपल्या घरी गेला. त्यानंतर मिहीर, त्याची आई, बहीण बेपत्ता झाले. तिघांनी आपापले फोनही बंद केले होते.

रविवारी सकाळी वरळी पोलिसांनी शाह आणि बिदावत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री या दोघांना अटक करण्यात आली. मिहीरसाठी देशभरातील विमानतळांना लूकआऊट नोटीस देण्यात आली. मिहीरच्या शोधार्थ विविध पथके तयार केली गेली आणि अखेर त्याला शहापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -