Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीदेशांतराला गेलेले विव्हल पक्षी

देशांतराला गेलेले विव्हल पक्षी

ऋतुराज – ऋतुजा केळकर

आई आणखी बाबा यातून
कोण आवडे अधिक तुला ’’
गाण्याचे सूर कॅलेंडर बघता बघता माझ्या कानावर पडले आणि माझी नजर गुरुपौर्णिमेच्या तारखेवर पडली. एका जीवाला जन्म देणे हे तिच्याकरिता पुनःपुन्हा जन्माइतके कठीण आहे हे माहिती असूनही ते आनंदाने स्वीकारणारी माता तसेच जन्मभर आपल्याला गगनभरारी घेता यावी, आपल्या पंखात बळ निर्माण व्हावं म्हणून आपल्या सुखाचे, आपल्या आरोग्याचे एक एक पिस उचकटून आपल्याला बळकटी देणारा आपला बाबा हे खऱ्या अर्थाने आपले पहिले गुरू असतात.

मान्य, आईपणाचा आनंद हा फक्त त्या आपल्या पिल्लाला पदराखाली धरल्यावरच जाणवतो. तर घरासाठी, घरातल्या माणसांसाठी झिजण्यातील तृप्तता ही त्या पित्याला. उंच मोकळा आकाशात गरूडझेप घेताना या झेपांमधील गुढतेची जाणीव एक गुरू म्हणून करून देताना या पित्याला प्रसंगी कठोरपणा दाखवावाच लागतो, तर काऊचिऊच्या गोष्टीत रममाण करून नावडत्या पण पौष्टिक पदार्थांना भरवता भरवता आई आपल्या मनात चैतन्याच्या नवनवीन खुणा जागवते. त्यामुळेच असेल कदाचित आजच्या नव्या पिढीच्या मनात प्रतिभेचा तसेच कर्तृत्वाचा सूर निर्विवादच अधिकाधिकच सुरेल होत चालला आहे. भविष्याचे वेध घेत उन्मुक्त अनुभूतींसाठी मनात रम्य अपेक्षांची पहाट उमलवत देखण्या बहराने वाकलेल्या गुलमोहरी जगण्याची उमेद जागवणाऱ्या या आयुष्याच्या अगदी प्रथम पायरीवर भेटलेल्या या दोन्ही गुरूचे आपण तहहयात ऋणी राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं.

जीवन सागरात अनेकानेक लाटा येतात. त्यात कधी सुखाचे इंद्रधनुशी शिंतोडे असतात तर कधी जीवन अगदी मृत्यूच्या गर्तेत लोटणाऱ्या दुःखाच्या झंझावाती लाटा असतात. यात अंधाराचे पाश कितीही बळकट झाले तरीही अंतरंगातील या गुरूंनी लावलेले संस्कारांचे, संस्कृतीचे तसेच स्नेहाचे मंगल कंदील कधीच विझू देऊ नका कारण, त्याच कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात मनामनात स्नेहमय प्रकाशाची किरणे डोकावतात की जी आपल्याला रोजच्या आयुष्यात उदात्त सौंदर्याची यशाची आणि समृद्धीची आराधना करण्यास भाग पाडतात.

कसं आहे ना की, शुभंकर आयुष्य जगणं ही एक कला आहे. त्यात सामाजिक, आर्थिक तसेच मानसिक उद्रेकांची गुंफण असते. तसेच जीवनाच्या या ऋतू भारणीत कधी बहारदार सुख-समृद्धी, ऐश्वर्याचे ऋतू आहेत तर कधी अवमान, अपयश यांची पानगळही आहे. त्यातच जगण्याचा आनंद हा शोधायचा असतो आणि त्यातून तो आनंद मी तू पणाच्या शिंपीतून बाहेर काढून मनासारखी रचना कशी घडवायची असते त्याचे ज्ञान तसेच मार्गदर्शन हे आपले आई-वडील प्रथम गुरू म्हणून देत असतात.

तसं बघायला गेलं तर माणूस हा मरेपर्यंत काही ना काही तरी शिकतच असतो. पण, कुरूपतेमधील सुंदरता शोधून माणुसकीचे मळे फुलवणारी मने शोधून सुखाच्या फुलबागा साऱ्यांच्या जीवनात कशा निर्माण करायच्या ते आपल्याला जीवनचक्राच्या रहाटगाड्यात कुणी ना कुणी तरी गुरू बनून शिकवतचं असतं. त्या प्रत्येक प्रसंगातून या जीवनाच्या बाजारात हिंडताना दिसलेल्या, अनुभवलेल्या प्रत्येक क्षणातून पुढे पुढे जाणं म्हणजे जीवन जगणं होय. यात आपला दीपस्तंभ म्हणून आई-वडिलांचे मोठे योगदान असते.

कसं आहे ना माणूस हा आधी एक प्राणी आहे. तो जन्माला येतो पण, त्यात माणुसकीचा झरा निर्माण करावा लागतो. तसेच आणखी एक गोष्ट ती म्हणजे माणूस हा फक्त भाकरीवर जगत नाही तर तो प्रेमाचा तसेच मायेचाही भुकेला असतो. माणुसकीतील प्रेम, माया तसेच ममता यातील सौंदर्याची उपासना ही एक अत्यंत कठीण अशी आराधना आहे आणि हीच आराधना करण्याचे मंत्राची दिक्षा आपल्याला आपले हे गुरू देत असतात.

म्हणूनच गीता, कुराण किंवा बायबल हे सगळे धर्मग्रंथ हे जरी जीवनमूल्ये शिकवत असले तरी आपल्या बाहूंना आधार देऊन जगात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला धृवताऱ्याप्रमाणे आपल्याला तळपत ठेवायला मदत करणाऱ्या आपल्या ‘माता आणि पिता’ या पहिल्या गुरूंना मरेपर्यंत अंतर देऊ नका तरच गुरुपौर्णिमा या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला उलगडला असे मी म्हणेन.

शेवटी कसं आहे ना की स्वप्न साध्य म्हणजेच स्वप्नपूर्तीकरिता धर्मापेक्षा ही संस्कारांच्या शालीची ऊब ही जास्त महत्त्वाची असते आणि आपल्याला जर भविष्यकाळात भुतकाळाच्या रंगपुष्करणीचे तरल रंग भरायचे असतील तर वर्तमानात आपल्या देह गोंदणाचे तैलचित्र हे साऊल संस्कारांच्या लक्ष्मण स्पर्शानेच गोंदवून घ्यावे लागतील नाही तर भविष्यात…

“ हिवाळ्याचा परतपाठवणीला…
देशांतराला गेलेला विव्हल पक्षी…
विदग्ध लहरींच्या लयतत्त्वात …
हरवून जाईल…
हरवून जाईल…
इतकंच लक्षात असू द्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -