वैजयंती कुलकर्णी आपटे , मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात हिट ॲण्ड रनचा सिलसिला चालू आहे. गेल्या महिन्यात पुण्यात अति श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत महागड्या पोर्शे कारने दोघा तरुण-तरुणींना उडविले, त्याचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच मुंबईतील वरळी येथे शिवसेना उपनेते राजेश शहा यांच्या मुलाने दारूच्या नशेत स्कूटरवरून जाणाऱ्या एका कोळी दांपत्याला महागड्या बीएमडब्ल्यू कारने उडवले. त्यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. पाठोपाठ पुण्याजवळ खडकी येथे एका कारने पोलिसांच्या मोटरसायकलला धडक दिली त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. त्याच दिवशी दापोडी येथेही पोलिसाच्या स्कूटरला कारने धडक देऊन त्याचा मृत्यू झाला. याशिवाय संभाजी नगर, नाशिक, नागपूर येथेही अशाच प्रकारे दारू पिऊन अति वेगवान गाडीने पादचाऱ्यांना उडवल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात सर्व दूर पावसाचा धुमाकूळ चालू आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. त्यामध्येही अनेक जणांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे राज्यात अपघाती मृत्यूचे सत्र चालू आहे आणि त्यावर कडक कारवाई किंवा काही ठोस उपाययोजना होत नाही. कारवाईचा विषय आला की, त्यात पोलिसांचे लागेबांधे, राजकीय हस्तक्षेप हे सगळे येतेच आणि कडक कारवाई काही होत नाही.
आता पुण्याच्याच अपघाताचे उदाहरण घ्या ना. वेदांत आगरवाल हा १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा. त्याच्या बिल्डर वडिलांनी नवी कोरी पोर्शे गाडी की, जी आरटीओकडे नोंदणीही झाली नव्हती, अशी गाडी मुलाच्या हातात दिलीच कशी. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. बारमध्ये अशा अल्पवयीन मुलांना मद्य कसे दिले जाते आणि नशेत धुंद होऊन ही मुले अति वेगाने गाड्या उडवतात. या वेदांतला लगेच अटकही झाली नाही. जेव्हा या अपघातावरून खूप गदारोळ झाला तेव्हा अटक झाली आणि लगेच जामीनही मिळाला. गंमत म्हणजे जेव्हा या मुलाला बाल हक्क समितीसमोर उभे केले तेव्हा फक्त एक ३०० शब्दांचा निबंध लिहून दे असे सांगून त्याची सुटका करण्यात आली. या सुटकेवर समाज माध्यमे आणि सर्वसामान्य जनतेने टीका केली तेव्हा त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले. आता त्याची इथूनही सुटका करण्यात आली आहे. त्याच्या रक्तात दारूचे अंश मिळू नयेत म्हणून त्याच्या आईचे रक्ताचे नमुने घेऊन न्यायालयाची फसवणूक करण्यात आली. अपघाताच्या वेळी ड्रायवर गाडी चालवत होता, असे खोटे सांगण्यास भाग पाडणाऱ्या वेदांतच्या आजोबांनाही अटक करण्यात आली. म्हणजे एका अपघातमुळे वेदांतचे आई, वडील आणि आजोबा अटकेत आहेत.
रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून होस्पिटलचे डीन आणि संबंधित डॉक्टर निलंबित झाले. मात्र अटक करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी पोलिसांवर मात्र काही कारवाई झाली नाही. तीच गोष्ट आता मुंबईतल्या हिट ॲण्ड रन प्रकरणाची आहे. त्यात आरोपी मिहीर शहा, शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्यामुळे यातही राजकारण येणार. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातही आरोपी मिहीर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. मिहीर फरार होता म्हणून त्याच्या वडिलांना म्हणजेच राजेश शहा यांना अटक केली. पण कोर्टाने त्यांना आता अटक बेकायदेशीर ठरवून जामिनावर सुटका करण्यात आली आहे आणि आता मिहीरला गुन्ह्यानंतर ७२ तासांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मिहीरची आई, बहीण आणि चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील राजेश शहा हे जरी जामिनावर सुटले असले तरी त्यांचे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते पद मात्र गेले आहे. या अपघातातील आरोपी मिहीर याला अटक करण्यासाठी इतका उशीर का झाला, असे विचारून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण हेच आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात नाईट लाईफचा आग्रहाने पुरस्कार करत होते.
रात्रीच्या वेळी मुंबई किंवा पुण्याच्या रस्त्यावर वेगमर्यादा न पळणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? खरे तर त्या त्या विभागाच्या पोलीस ठाण्याला आणि वॉर्ड अधिकाऱ्यांना आपल्या विभागात किती दारूचे बार आहेत, ते किती वाजेपर्यंत उघडे असतात याची सर्व माहिती असते. मात्र हफ्तेखोर पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची याबाबत मिलिभगत असते. त्यामुळेच हे बारमालक बिंधास्तपणे बार रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवत असतात. आर. आर. पाटील म्हणजेच आपले आबा हे गृहमंत्री असताना त्यांनी या बारवर धडक कारवाई केली होती. मात्र त्या वेळेस बारबालांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता पुण्यातल्या पोर्शे कारचे प्रकरण झाल्यावर पुण्यातही अशा बेकायदेशीर बारवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच हित ॲण्ड रण प्रकरणात अभिनेता सलमान खान अडकला होता. वांद्रा येथे रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर त्याने दारूच्या नशेत गाडी घातली होती. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. पण तो सलमान असल्याने तो या केसमधून सहीसलामत सुटला.
या वर्षी २०२३ पेक्षा रस्त्यावरील अपघातात ३४ टक्के वाढ झाली आहे आणि अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही ४ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र इकोनोमिक सर्वेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अहवाल गेल्याच आठवड्यात सादर केला. २०२१ मध्ये अपघात झाले त्यामध्ये १३,५२८ जण मृत्युमुखी पडले आणि २३,६७१ जण जखमी झाले, तर २०२२ मध्ये ३३,३८३ आपघात झाले, त्यात १५,३२४ लोक मरण पावले, तर २७,२३९ जखमी झाले. २०२३ मध्ये अपघातांची संख्या ३५,२४३ झाली. या अपघातात मृतांची संख्या ३५,३३६ होती आणि २९,७६४ जखमी झाले. २०२२ साली रस्त्यावरील अपघातांत जीव गमवलेल्यांची संख्या १,६८,४९१ होती. त्यापैकी १,५०३ अपघात हे मद्यधुंद अवस्थेत अति वेगाने गाडी चालवल्यामुळे झाले. तज्ज्ञांच्या मते, हे सर्व अपघात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत गाड्या अति वेगाने चालवण्यामुळे होत आहेत. काही अपघात गाडी रस्ता दुभाजकाला आपटल्याने झाले आहेत, तर काही उड्डाण पुलावरून भरधाव गाड्या चलवल्याने झाले आहेत. यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पादचाऱ्यांना चालायला पुरेसे पदपथ नसणे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे चालू आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला जागाच नाही. खड्ड्यात पडूनही पादचाऱ्यांचा अपघात होतात.
या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री रस्त्यावर पोलिसांची गस्त असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चौकाचौकांत सीसीटीव्हीद्वारे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर त्वरित कारवाई करणे. मुंबईसारख्या शहरात २६ ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आहेत. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर दिवे नसले, तर वाहनचालकाचे नियंत्रण सुटण्याची भीती असते. म्हणून तिथे दिव्यांची व्यवस्था करण्याची गरज आहे. अशा उपायांनी अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह, दारू पिऊन गाडी चालवणे याबाबत कठोर कायदे करण्याची गरज आहे. प्रकरणी चालक दोषी असेल तर केवळ पाच हजार रु. दंड आहे आणि मृत्यू झाल्यास ५ वर्षांची कैद होऊ शकते. पण फारच थोड्या प्रकरणात अशी शिक्षा झाल्याचे दिसते. आता पुणे पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्याची घोषणा केली आहे. ड्रंक ड्राइव्ह आणि हिट ॲण्ड रनसारख्या अपघातात वाहन चालकावर, कुठल्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई झालीच पाहिजे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…