विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान
मुंबई : आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने १२ पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं असेल. विधानपरिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणत्या एका उमेदवाराचा पराभव होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.