जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
माझ्या बोलण्यातून परमेश्वर हा विषय मांडताना मी मोक्षाविषयी सांगितले होते. तोच विषय थोडा विस्ताराने सांगावा अशी काही लोकांनी विनंती केली. मी आधीही सांगितले आहे की, मोक्ष नावाचा प्रकारच नाही. आपले स्वरूप हे सच्चिदानंद स्वरूप आहे व ते आनंदाची उधळण करीत असते. आपल्याला आनंद झाला की, आपण गप्प राहतो का? तेंडुलकरने षटकार मारल्यावर आपण आनंदाने टाळ्या पिटतो. शतक मारल्यावर सगळे लोक त्याचे अभिनंदन करायला धावतात. आनंद हा स्फुरद्रूप आहे हे मला सांगायचे आहे. एखाद्याला लॉटरी लागली तर तो काय स्वस्थ बसणार का? तो आनंदाने उडेल, नाचेल, पेढे वाटेल. आनंद हा स्फुरद्रूप आहे. त्याला खरे स्वानंद हे नाव आहे.
आनंद हे आपले स्वरूप असून तो आनंद हा स्फुरद्रूप असल्यामुळे आपल्या जाणिवेला त्या आनंदाचा स्वाद घेण्याची सहज प्रवृत्ती आहे. ती जाणीव शक्तीचा आलंब घेऊन ती जाणीव आनंदासाठी स्फुरद्रूप होते. स्फुरद्रूप होऊन ती काय करते? अनंत रूपे अनंत वेशे प्रकट होण्यासाठी ती उपाधी धारण करते. उपाधी धारण केल्याशिवाय ती आनंद घेऊ शकत नाही. प्रकट होण्यासाठी कुठल्याही शक्तीला उपाधी लागते. परमेश्वराने ही उपाधी धारण केल्यानंतर ते जे दिव्य तत्त्व आहे, त्या जाणिवेला मायेचा स्पर्श झाला. माया म्हणजे काय हे मी आधीही सांगितले आहे. मायेचा स्पर्श झाला आणि त्याचा परिणाम भ्रम निर्माण झाला. त्या जाणिवेत भ्रम निर्माण झाल्यामुळे ती दिव्य जाणीव गढूळ झाली. भ्रमामुळेच त्या शिवाचे रूपांतर जीवात झाले.
मला सांगायचा मुद्दा हा की हे आनंदस्वरूप प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. कुठलाही जीव घ्या. त्याचे सर्व आनंदासाठीच चाललेले असते. त्याला बोलता येवो किंवा न येवो. एखाद्या माणसाला बोलता येत नसेल तरी तो आपल्याला आनंद झालेला आहे हे खुणेने सांगतो. पशुपक्षी आपला आनंद व्यक्त करत असतात. कोणी कावकाव, कोणी चिवचिव करेल, कोकीळ सुंदर आवाजात गाणी गाईल. निरनिराळे पशुपक्षी आपला आनंद वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात. त्यांना बोलता येत नसले तरी ते आनंद प्रकट करतात. हा आनंद स्फुरद्रूप असल्यामुळे व तो आनंद जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे जीव किती वेळा जन्माला आला तरी तो मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतोच. इथे आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे जन्माला येतो व मरतो हे शब्द जे आपण वापरतो ते मुळात चुकीचे आहेत. कारण प्रत्यक्षात जीव जन्माला पण येत नाही आणि मरतही नाही.