Saturday, June 21, 2025

जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार; सरकारचा इशारा!

जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार; सरकारचा इशारा!

दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना आले वीरमरण


जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवार, ८ जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. 'आमच्या पाच जवानांच्या हत्येचा बदला घेणार आणि या दुष्ट शक्तींचा नाश करणार, असा इशारा संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिला.



दहशतवाद्यांना इशारा


संरक्षण सचिवांनी म्हटले की, 'कठुआ जिल्ह्यातील बडनोटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पाच शूर जवानांना वीरमरण आले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करतो. त्यांनी देशासाठी केलेली निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील आणि त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल.


भारत या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींचा नक्की नाश करेल.' संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जवानांच्या बलिदानाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.



दहशतवाद्यांनी हल्ला कसा केला?


लष्कराचे वाहन कठुआच्या बडनोटा येथील डोंगराळ भागात गस्तीसाठी निघाले होते. एका बाजूला दरी असल्याने वाहनाचा वेगही कमी होता, त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. यावेळी टेकडीवर घात लावून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक वाहनावर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र सर्व दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या घटनेत एका अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद झाले, तर इथर ५ जखमी जवानांवर पठाणकोट मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment