‘वारी’ हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा आहे. लाखो भाविक आणि वारकरी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सामील होतात. त्यातून त्यांना कोणत्याही लाभाची अपेक्षा नाही. केवळ विठ्ठलाच्या भक्तीप्रेमसुखाचा अनुभव घेण्यासाठी, हा लाखोंचा समुदाय वारी करत असतो. याच वारीच्या सोहळ्याचा आनंद अनुभवता यावा, या हेतूने ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनी एकत्रितपणे सुरू केलेला आहे.
आपल्या घरापासून पंढरपूरपर्यंत चालत जाणं म्हणजे वारी. पुढे सतराव्या शतकात वारीला पालखी सोहळ्याची जोड मिळाली. तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराजांनी पहिला पालखी सोहळा सुरू केला. हा पालखी सोहळा तुकोबांचा होता. त्यानंतर इतर पालखी सोहळे सुरू झाले. यातल्या संत ज्ञानेश्वर माऊली किंवा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एक दिवस सहभागी होण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला आहे. सामाजिक समतेचा आणि करुणेचा विचार इथल्या समाजमनात रुजवणाऱ्या या क्रांतीकारी संतपरंपरेचा उज्ज्वल वारसा यानिमित्ताने अनेकजण समजून घेतात.
जवळपास चारशे वर्षांची वारकरी संतांची एक दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकोबा हे वारकरी परंपरेतील प्रमुख चार संत. नामदेवरायांनी वारीच्या सोहळ्याला तात्विक आणि संघटनात्मक स्वरुप दिलं. त्यांनी मंदिरातलं कीर्तन वाळवंटात आणलं. अठरापगड जातीच्या स्त्री-पुरुषांना भक्ती परंपरेत समभावानं आणि प्रेमभावानं सामील करून घेतलं. भागवत धर्माचा प्रसार भारतभर केला. त्याचवेळी ज्ञानदेवांनी त्यांची सोबत केली. नामदेव- ज्ञानदेवांचा हा वारसा संत एकनाथांनी पुढे नेला. त्यांनी दलितांच्या घरी जेवण करून जातीय विषमतेला हादरा दिला. पुढच्या काळात वेदांवरच्या ब्राह्मणांच्या मक्तेदारीला आव्हान देत तुकोबा उभे राहिले. धर्मातली घाण साफ करताना, त्यांनी कडक भाषा वापरली. त्यासाठी धर्मपंडितांशी पंगा घेतला.
नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकोबा हे वारकरी परंपरेतील प्रमुख संत होते. पण त्यांच्यासोबतच संत विसोबा खेचर, संत सावता माळी, संत सेना न्हावी, संत चोखा मेळा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत, संत लतिफ, संत शेख महंमद, संत नरहरी सोनार, संत गोरोबा काका आणि अशा अठरापगड जातीच्या अनेक संतांनी भक्तीपरंपरेचं भरण पोषण केलेलं आहे.
मध्ययुगीन कालखंडात चातुर्वण्याच्या विषमतावादी आणि अन्यायकारी व्यवस्थेतून समाज दुभंगला होता. धर्माच्या नावाने रुजलेल्या जातींच्या रचनेमुळं समाजातलं चैतन्य आणि कर्तृत्व हरवलं होतं. आपला समाज निरर्थक कर्मकांडाच्या कचाट्यात सापडला होता. त्यावेळी वारकरी संतांनी भक्तीप्रेमाचा मार्ग दाखवला. परमेश्वर आणि भक्ताच्या मधल्या पुरोहित नावाच्या दलालाला हद्दपार केलं. गुरुबाजी आणि बुवाबाजी धुडकावली. संतांची महत्त्वाची शिकवण म्हणजे कर्म हीच भक्ती” बाराव्या शतकात “कायकवे कैलास” म्हणजेच काम करत राहण्यानेच मोक्ष (कैलास) मिळतो हा विचार बसवण्णांनी मांडला होताच. एका अर्थाने तोच वारसा “कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी॥” अस सांगत संत सावतोबांनी पुढे नेला.
महिलांच्या समान अधिकारांचा मुद्दा आज आपण महत्वाचा मानतो. पण संत परंपरेने महिला संतांना भक्तीचा अधिकार दिला. स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास। हा विश्वास देणाऱ्या संत जनाबाई हे या परंपरेतलं जिवंत. जनाबाईंपासून बहिणाबाईंपर्यंत अनेक महिलांना वारकरी संप्रदायात संतपदाला पोचता आलं. रविदास, कबीर, दादू दयाळ, नानक आणि मीराबाई असे उत्तर भारतातले बहुतेक संत नामदेवरायांच्या प्रेरणेतून उभे राहिले होते. आपल्या तुकोबारायांनी या सर्व संतांचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला आहे. उत्तर भारतातले हे अमराठी असलेले संत आपल्या वारकरी संप्रदायाने पूज्य आणि सन्मान्य मानलेले आहेत. यातून संतांचा राष्ट्रीय एकात्मेचा विचार दिसतो.
आज स्वतंत्र भारतात संविधान संमत राजवट सुरु आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित उद्याच्या भारताचं स्वप्न आपण भारतीयांनी संविधानाच्या माध्यमातून स्वीकारलं आहे. राज्यव्यवस्थेने आणि नागरिकांनी संविधानाला प्रमाण मानून व्यवहार करणं अपेक्षित आहे. संविधान केवळ कायदे कानून सांगणारं पुस्तक नाही. ते भारतीय नागरिकांना व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनासाठी एक समग्र अशी मूल्यव्यवस्था देणारं पुस्तक आहे असं आम्ही मानतो. संतपरंपरेचा उदार मानवतावादी विचार आणि संविधानाला अपेक्षित स्वातंत्र्य-समता-बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार हा एकाच परंपरेचा भाग आहे हे उघडच आहे. आज भारतीय समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न, समस्या आ वासून उभ्या आहेत. कारण संविधानाच्या स्वप्नाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना साध्या सोप्या उपासनेच्या मार्गाने एकत्र बांधून ठेऊ शकणाऱ्या संतविचारांना ही आपण नीट समजून घेऊ शकलेलो नाहीत असे दिसतंय. हा संतविचार सामुहिकरित्या नीट समजुन घ्यावा, त्या विचारांचं संविधानाशी असलेलं नातंही समजुन घ्यावं आणि सामुहिकरित्या त्या शिकवणीशी कृतीशील नाते जोडाचे असेल तर एकदिवस तरी वारी अनुभवलीच पाहिजे.