स्थानिकांना रोजगार, ठेके देण्याची मागणी
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रात नव्याने होऊ घातलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज या कंपनी प्रकल्पात वारंवार मागणी करूनही स्थानिकांना प्राधान्य न देता, बाहेरील भरती सुरू केल्याने देशमुख कांबळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी मंगळवारी कंपनीच्या विरोधात गेटसमोर आंदोलन करीत, स्थानिकांना नोकरी व ठेके न दिल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महाड एमआयडीसीमधील नव्याने उभ्या राहत असलेल्या ग्रासीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरोधात देशमुख कांबळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी कंपनीच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने बाहेरील कामगारांची भरती केली आहे. कुशल कामगारांना देखील थर्ड पार्टी पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या. या विरोधात त्यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले.
कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, कुशल कामगार स्थानिकच घ्यावेत, तसेच कंपनीला आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक ठेकेदारच नेमावेत, अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला, पंरतु त्याकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले गेले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी देशमुख कांबळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख, बंडू देशमुख यांसह ग्रामपंचायत सदस्य व सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.