दुय्यम अभियंत्यांना अधिक सक्रियपणे खड्डे शोधून भरण्याचे आदेश
मुंबई : मुंबई शहरात एका दिवसात अवघ्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. परिणामी काही रस्ते खरवडल्याची, तर काही ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे (pits) छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे स्पष्ट निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबई शहरात सोमवारी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत ६ तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईकर नागरिकांना रस्ते प्रवासादरम्यान कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उदिष्ट ठेवून कार्यवाही करावी, असे निर्देश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते खरवडण्याची, रस्त्यांना खड्डे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे २२७ दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरले पाहिजे. दुरूस्तीयोग्य रस्ते (बॅड पॅचेस), खड्डे शोधले पाहिजेत. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली पाहिजे. ‘टायमिंग’ हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी पालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे. जेणेकरून नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर व विनाव्यत्यय होईल. नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारींचा विहीत मुदतीत निपटारा झालाच पाहिजे. पालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून खड्डे भरण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घेतली पाहिजे. रस्ते दुरुस्ती कामामध्ये अभियंत्यांकडून तत्परता (अर्जन्सी) दिसली पाहिजे, जेणेकरून खड्डा निदर्शनास आल्यास अथवा निदर्शनास आणून दिल्यास २४ तासांत खड्डा भरला जाईल.
रस्ते, मुख्य रस्ते त्याचबरोबर द्रुतगती महामार्गाच्या देखभाल – दुरूस्तीची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरात कमी वेळेत जास्त पडणारा पाऊस, विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ, वाहतूक घनता, विविध उपयोगिता सेवावाहिन्यांसाठी खोदलेले चर या विविध कारणांमुळे रस्त्यांची हानी होते. तथापी, सुलभ प्रवासासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून रस्त्यांची डागडुजी केली पाहिजे. रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी कारवाई करू, अशी सक्त ताकीद देखील अभिजित
बांगर यांनी दिली.