राज्य सरकारचा हा निर्णय सर्व घटकांना आनंद देणारा – आमदार श्रीकांत भारतीय
मुंबई : बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुला-मुलींसाठी पुढील शिक्षण राज्य सरकारतर्फे मोफत देण्यात येईल, असा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कॅबिनेटमध्ये मांडला. या विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तो मंजूर करून घेतला. या निर्णयामुळे बालगृहातून बाहेर पडणाऱ्या संस्थात्मक आणि संस्थाबाह्य मुलांसाठी पुढील शिक्षण मोफत असणार आहे. या निर्णयाचे राज्यामध्ये सर्व स्तरांमध्ये स्वागत केले जात आहे. मागील ६ वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष व भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी देखील राज्य सरकारच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत केले आणि त्यांचे आभार मानले आहे.
या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना भाजप आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले की, आजचा दिवस हा माझ्यासारख्या बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. हजारो नवयुवक दरवर्षी अनाथालयातून बाहेर पडतात. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा दिवस आहे. मागील कित्येक वर्षांपासून बालगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक मुलगा या निर्णयाची वाट पाहत होता. या मुलांना फक्त शिक्षण हवे आहे. पण जर १८ वर्षांपर्यंत बालगृहामध्ये मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेत असेल तर १८ वर्षानंतर बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांची जबाबदारी सरकार का घेऊ शकत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय कॅबिनेटमध्ये मांडला व मंजूर करून घेतला. त्यासाठी मी त्यांचे व राज्य सरकारचे आभार मानत आहे. या निर्णयामुळे बालगृहातून बाहेर पडणाऱ्या सर्व संस्थात्मक व संस्थाबाह्य अनाथ मुलांसाठी पुढील शिक्षण मोफत मिळणार आहे. त्त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारवर असेल. त्याला शिक्षणासाठी कुणाच्याही दरवाजात जाण्याची गरज भासणार नाही.
श्रीकांत भारतीय पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी १ टक्का आरक्षणाचा निर्णय घेतला होता आणि नंतर त्यामध्ये संस्थाबाह्य अनाथ मुलांचा देखील समावेश करण्यात आला. या निर्णयाला बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांनी न्याय दिला. आज त्यातील कित्येक मुले व मुली पोलीस अधिकारी, तलाठी, नर्सेस झालेली आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला आहे, या संवेदनशील निर्णयाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल, याची मला खात्री आहे. मागील ६ वर्षांपासून आमची तर्पण फाउंडेशन ही संस्था बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी लढा देत आहे. या लढ्यामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. पण ही कुण्या एका संस्थेची ताकद नाही, तर संपूर्ण समाजाची ताकद आहे. कारण ज्यावेळेस समाज एखाद्याच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा यश हे मिळतेच. बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांसाठी सरकारतर्फे मोफत शिक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा समाजातील सर्व घटकांना आनंद देणारा आहे. त्यासाठी मी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या सर्व मुलांच्या वतीने सरकारचे आभार मानत आहे.