मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना रविवारी पहाटे ( ७ जुलै रोजी ) घडली होती. या घटनेत कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही पुढे येत होती. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना वरळी अपघाताबाबत तसेच पीडित कुटंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, आम्ही पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुढे बोलताना, पीडित कुटुंबाला आर्थिक कुटुंबाला आर्थिक मदत देणार का? असं विचारलं असता, आम्ही पीडित कुटुंबाच्या बरोबर आहोत. ते आमच्याच परिवारातील सदस्य आहेत. त्यांना जी काही मदत लागेल, मग ती कायदेशीर असो, किंवा आर्थिक असो, त्यांना मदत केली जाईल.
पिता राजेश शाहांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाचे वडील राजेश शाहांची उपनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास राजेश शाहांच्या मुलाने बीएमडब्ल्यू कारने वरळीत दाम्पत्याला उडवले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती थोडक्यात बचावला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहा रविवारपासूनच फरार होता. त्याला काल विरारमधून अटक करण्यात आली. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे.यानंतर बुधवारी राजेश शाहांना एकनाथ शिंदेंनी उपनेतेपदावरुन हटवले. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने राजेश शाहांच्या हकालपट्टीचा आदेश काढला आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या आदेशावरुन राजेश शाहांना शिवसेना उपनेतेपदावरुन कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हिट अँड रनच्या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राजेश शाहांना या प्रकरणात अटक झालेली होती. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन दिला.
मुलगा मिहीर शाहाला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेत मुख्य आरोपी मिहीर शाहाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात अटक केलेल्या मिहिर शाहा याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बुधवारी त्याला शिवडी कोर्टाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाने कबुलीनामा दिला आहे. अपघाता दरम्यान मी गाडी चालवत असल्याचे त्याने मान्य केले आहे. कावेरी नाखवा (वय ४५) असे या अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात सोमवारी (दि.८) पहाटे घडला होता. वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी मिहिर शाहाला ७२ तासांनंतर मंगळवारी अटक करण्यात आली. अपघातानंतर तो फरार झाला होता. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती. दरम्यान त्याने बुधवारी पोलिसांना जबाब दिला आहे की, अपघातादरम्यान मी गाडी चालवत होते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.