Sunday, March 23, 2025
Homeमहामुंबईभिवंडी महापालिका हद्दीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस

भिवंडी महापालिका हद्दीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस

तीन दिवसांत १२० नागरिकांना श्वानदंश

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका (Bhiwandi municipal) हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी (Sterilization of dogs) करणारे श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे, भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची (Street Dogs) आणि त्यामुळेच पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीस लागलेली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होत असताना, या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसाळल्याने, अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागलेल्या आहेत. ७ व ८ जुलै या दोन दिवसांत तब्बल १३५ जणांना श्वान दंश झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण जून महिन्यात ८८६ जणांना श्वान दंश झाल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली.

७ जुलै रोजी कामतघर परिसरात ६० श्वान दंश झाले होते, तर शांतीनगर भागात ८ जुलै रोजी ४५ जणांना श्वान दंश झाले. या व्यतिरिक्त इतर भागात सुद्धा श्वान दंशाच्या घटना घडल्या असून, या दोन दिवसांत एकूण १३५ रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला आहे. रुग्णालयात रेबीज डोसचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती अधीक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून, आयुक्त अजय वैद्य यांनी २०२३ पासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. परंतु संस्थांकडून प्रतिसाद आला नाही. दरम्यान आचारसंहिता सुरू झाली होती. ८ जुलै रोजी या बाबतच्या फाईल्स वर स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या असून आठ दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी, यंत्रणा सज्ज करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -