१८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, ३०हून अधिक गंभीर
लखनऊ : महाराष्ट्रासह विविध राज्यात अपघातांचे (Accident) सत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. आजही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी उन्नावमधील एक डबल डेकर बस दूध टँकरला जोरदार धडकली. या भयंकर अपघातामुळे १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस मार्गावरील बेहता मुजावर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गढा गावासमोर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डेबल डेकर बसला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात १८ प्रवाशांनी जागीच जीव गमावला असून ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि दुधाच्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, खूप मोठा आवाज झाला. आवाजाने आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.