नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा मनस्ताप
पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) वसई (Vasai), विरार (Virar) शहरातील महानगरपालिकेच्या रस्त्यांची गेल्या आठवड्यात दुर्दशा झाली आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा (Bad Road condition) झाल्याने प्रवासी वाहने व नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या शहराच्या पूर्वेस असलेल्या अनेक रस्त्याची पार चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने जीव मुठीत धरून चालवाव्या लागत आहेत. तर पादचाऱ्यांना रस्त्यावरून येजा करणे,अशक्य झाले आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट, पाणीचोरी, घरपट्टी घोटाळा, वसुली, नैसर्गिक नाल्यातील अनधिकृत बांधकामे,अतिवृष्टी झाली की शहरात पाणी तुंबून किमान तीन दिवस जनजीवन विस्कळीत होणे, साफसफाई न करणे व चार शहरातील रस्त्याची दुर्दशा, असा अनागोंदी कारभार करदात्यांच्या पाचवीला पुजला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदारांना पॅचवर्क करण्याचे ठेके दिले होते. पण ठेकेदारांनी थुकपट्टीची कामे करत महानगरपालिकेला चांगलाच चुना लावला आहे.
या सर्व ठेकेदारांना मनपा अधिकारी व राजकीय पाठबळ असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत असते. यंदा मनपा हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्यामुळे हद्दीतील चार शहरे पाण्याखाली जाण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनपा दरवर्षी रस्ते दुरुस्ती व नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असते, पण त्याचा फायदा करदात्यांना होत नाही. उलटपक्षी मनपा अधिकारी व ठेकेदार मात्र मालामाल झाले आहेत.