दक्षिण आफ्रिका, युगांडातील मेगा क्लिनिकल ट्रायल यशस्वी
केपटाऊन : एका नव्या प्री-एक्स्पोझर प्रोफिलॅक्सिस औषधाचे इंजेक्शन वर्षातून दोन वेळा घेतल्यास, एचआयव्ही संक्रमणापासून १०० टक्के सुरक्षितता प्राप्त होते, असा दावा एका मेगा क्लिनिकल ट्रायलअंती (महावैद्यकीय चाचणी) करण्यात आला आहे. ही चाचणी डबल ब्लाईंडेड (दुहेरी गोपनीय) पद्धतीने घेण्यात आली, हे विशेष! चाचणीत सहभागी झालेल्या लोकांना (इंजेक्शन घेणार्यांना) अथवा या मोहिमेतील स्वयंसेवकांनाही आपण नेमके कोणत्या आजारावर काम करत आहोत, त्याचा थांगपत्ता नव्हता. स्वतंत्र डेटा सुरक्षा निरीक्षण मंडळाने नुकतीच गोपनीय चाचणी थांबविण्याची आणि सहभागी लोकांना नेमकी कल्पना देण्याची शिफारस केलेली आहे.
‘लेनॅकॅपावीर’ या औषधाचे ६ महिन्यांच्या अंतराने दिले जाणारे इंजेक्शन दोन अन्य औषधांच्या (गोळ्यांच्या स्वरूपातील) तुलनेत एचआयव्ही संक्रमणापासून अधिक सुरक्षितता देते किंवा कसे, त्याचा वेध या चाचणीतून घेण्यात आला. ‘लेनॅकॅपावीर’ व गोळ्यांच्या स्वरूपातील दोन्ही औषधे प्री-एक्स्पोझर प्रोफिलॅक्सिस (पीआरईपी) औषधे आहेत. ‘लेनॅकॅपावीर’च्या वापराने दिसलेले परिणाम हे उत्साहवर्धक आहेत, असे या उपक्रमाच्या दक्षिण आफ्रिका विभागाच्या प्रमुख संशोधक लिंडा गेल बेकर यांनी सांगितले.
चाचणीत सहभागी झालेल्या ५ हजार लोकांवर ‘लेनॅकॅपावीर’ आणि दोन अन्य औषधांच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले. युगांडात ३ ठिकाणी, तर दक्षिण आफ्रिकेत २५ ठिकाणी हे परीक्षण झाले. ‘लेनॅकॅपावीर’ हे ६ महिन्यांचे इंजेक्शन अधिक सुरक्षित आहे का, त्याची तपासणी झाली. तरुण वयोगटातील महिलांसाठी एचआयव्ही संक्रमणाविरुद्ध प्रतिबंधक ट्रूवाडा एफ/टीडीएफ या औषधाच्या तुलनेत ते (लेनॅकॅपावीर) अधिक सुरक्षितता प्रदान करते काय, हेही तपासले गेले.
सध्या ट्रूवाडा एफ/टीडीएफ ही गोळी एचआयव्ही प्रतिबंधक म्हणून व्यापक प्रमाणात वापरली जाते. डेस्कोवी एफ/टीएएफ (एक नवी दररोज घ्यावयाची गोळी) ही एफ/टीडीएफ इतकीच परिणामकारक आहे काय, हेही तपासण्यात आले. एफ/टीएएफ ही एक लहान आकाराची गोळी आहे. अधिक उत्पन्न असलेल्या देशांत पुरुष आणि ट्रान्सजेंडर महिला या गोळीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. एचआयव्ही संक्रमणाला बळी पडणार्यांत पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील तरुण महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे दररोज प्रतिबंधक उपचार घेणे या महिलांना जड जाते.
१०० टक्के परिणामकारक
चाचणीदरम्यान ‘लेनॅकॅपावीर’ घेणाऱ्या २ हजार १३४ महिलांपैकी असुरक्षित संबंधांनंतरही, एकही महिला एचआयव्ही संक्रमित झाली नाही. हे औषध या अर्थाने १०० टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले. ट्रूवाडा (एफ/टीडीएफ) घेणार्या १ हजार ६८ महिलांपैकी १६ (१.५%) आणि डेस्कोवी (एफ/टीएएफ) घेणार्या २ हजा १३६ महिलांपैकी ३९ (१.८%) एचआयव्ही संक्रमित झाल्या.