सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
पंढरपूर : यंदाच्या आषाढीवारीत (Ashadhi Wari 2024) वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा संपूर्णरित्या सज्ज झाली आहे. मात्र सध्या सातत्याने वाढत चाललेल्या अपघातांचे (Accident) सत्र रोखण्यासाठी तसेच मंदिर परिसरात भाविकांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांदरम्यान आता पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तपासणी दरम्यान कोणताही चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना (Drunk And Drive) आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आषाढी वारीत तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातून गेल्या काही दिवसांत मंदिर परिसरात भाविकांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच पोलिसांनी नामदेव पायरी येथे चोरीला गेलेले भाविकांचे २४ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने शोधून काढले होते. त्यादरम्यान शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी १३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३४ तोळे ४ ग्रॅम सोने हस्तगत केले. मात्र आता चोरीचा आणि अपघाताचा फटका वारकऱ्यांना बसू नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना काढल्या आहेत.
अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी
११ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि १२ जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाल्याचे सरदेशपांडे यांनी सांगितले. यासाठी पालखी जिल्ह्यात आल्यावर कोणती वाहतूक कुठून वळवायची, याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही अवजड वाहतूक पंढरपूर शहरात येणार नाही, याची काळजी घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी
सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात चालकांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून येत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली जात आहे. अशा मद्यपी चालकांचा भाविक किंवा वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व पालखी मार्गांवर तपासणी आणि गस्त सुरू ठेवली आहे. त्यासोबत गर्दी असणाऱ्या सर्व ठिकाणी प्रशिक्षित टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक टोल नाक्यावर ड्रंक अँड ड्राइव्ह संदर्भात मोठ्या प्रमाणात तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.