मुंबई/पुणे : हवामान खात्याने ९ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) दिला आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण कोकण आणि पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तर अन्य जिल्ह्यांत सर्व शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना मंगळवारी, ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.
तसेच अति मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील, असे या आदेशात म्हटले आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन देखील जिल्हाधिका-यांनी केले आहे.