जाणून घ्या नेमके प्रकरण काय
मुंबई : एकीकडे आरबीआय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कठोर (RBI Action) कारवाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांनाही आरबीआयने अॅक्शन मोड दाखवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज देण्याच्या अनियमित पद्धतींमुळे स्टार फिनसर्व्ह इंडिया आणि पॉलिटेक्स इंडिया या दोन नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFC) नोंदणी प्रमाणपत्रे (COR) रद्द केली आहेत.
केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील स्टार फिनसर्व्ह इंडिया ‘प्रोगकॅप’ (डेसिडेराटा इम्पॅक्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि संचालित) अंतर्गत सेवा पुरवत होती. पॉलीटेक्स इंडिया, मुंबईत मुख्यालय असलेले, ‘Z2P’ मोबाइल ऍप्लिकेशन (Zytek Technologies Pvt. Ltd.) अंतर्गत सेवा पुरवत होती. या कंपनीने कर्ज मूल्यांकन, कर्ज मंजूरी तसेच KYC पडताळणी प्रक्रिया यासारख्या सेवा आउटसोर्स केल्या आहेत. त्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.
त्याचबरोबर, पॉलिटेक्स इंडिया कंपनीने केव्हायसी (KYC) पडताळणी, क्रेडिट मूल्यांकन, कर्ज वाटप, कर्ज वसुली, कर्जदारांचा पाठपुरावा आणि कर्जदारांच्या तक्रारींची दखल घेणे व त्यांचे निराकरण करणे यासंबंधीचे मुख्य निर्णय घेण्याचे काम आउटसोर्सिंग करताना नियमांचे उल्लंघन केले. तर काही प्रकरणांमध्ये त्यांनी सेवा पुरवठादाराकडून जास्त व्याज देखील घेतले. या सर्व क्रिया आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध असल्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या दोन्ही संस्थांना यापुढे नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेचा (NBFI) व्यवसाय करता येणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.