
मुंबई : मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. यामध्ये मध्य रेल्वेवरील २, पश्चिम रेल्वेवरील २ आणि हार्बर रेल्वेवरील ३ स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. यानंतर आता मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईतील सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर ही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येतील.
दरम्यान, मध्य रेल्वेवरील करीरोड रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लालबाग तर सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनचे नाव डोंगरी करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनचे नाव मुंबादेवी आणि चर्नीरोड रेल्वे स्टेशनचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचे नाव काळाचौकी, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनचे नाव डोंगरी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनचे नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन करण्यात येणार आहे.
'या' सात स्टेशनची नावे बदलणार
करी रोडचे नाव – लालबाग
सँडहर्स्ट रोडचे नाव – डोंगरी
मरीन लाईन्सचे नाव- मुंबादेवी
चर्नी रोडचे नाव – गिरगाव
कॉटन ग्रीनचे नाव- काळाचौक
डॉकयार्डचे नाव – माझगाव
किंग सर्कलचे नाव- तीर्थनकर पार्श्वनाथ