
मिहिरसोबत आणखी १२ जणांना ठोकल्या बेड्या
मुंबई : पुणे पोर्शे कार अपघाताप्रमाणेच (Pune porsche car accident) वरळी 'हिट अँड रन' (Worli hit and run case) अपघात प्रकरणात देखील रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात कार चालवणारा आणि मुख्य आरोपी असलेला मिहिर शाह (Mihir Shah) हा पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांचा मुलगा होता. त्यामुळे पुण्यातील अपघात प्रकरणाप्रमाणेच या मुलाला वाचवण्यासाठी देखील शाह कुटुंब यामध्ये सामील झाल्याचं तपासातून समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर मिहिर शाह हा फरार झाला होता. त्याला राजेश शाह यांनीच पळून जाण्याचा सल्ला दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच फरार असलेल्या मिहिर शाहला बेड्या ठोकण्यात देखील मुंबईच्या गुन्हे शाखेला यश आलं आहे. त्याच्यासोबत पोलिसांनी आणखी १२ जणांना ताब्यात घेतलं आहे.
वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ झालेल्या अपघातानंतर मिहिर शाह फरार झाला होता. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली आहे. त्याच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शाह आणि त्याला मदत करणाऱ्या इतर १२ जणांना अटक केली आहे. या आधी पोलिसांनी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे.
पुण्याप्रमाणे या घटनेत देखील आरोपी मिहिर शाह कार चालवताना दारुच्या नशेत होता का हे तपासले जाणार आहे. मिहिर अपघातापूर्वी आपल्या मित्रांसमवेत जुहू येथील पबमध्ये पार्टी करत होता. तिथे १८ हजारांचं बिल झालं होतं असं पबमालकाने सांगितलं. मात्र, मिहिर दारु प्यायला नाही तर त्याने केवळ रेड बुल हे एनर्जी ड्रिंक घेतलं होतं, असं पबमालक म्हणाला. त्यामुळे आता मिहिरची तपासणी केली जाणार आहे.
मिहीरला पळून जाण्याचा वडिलांचा सल्ला
या प्रकरणात राजेश शाह यांनी अपघात झालेल्या गाडीवरील पक्षाचा झेंडा आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. तसेच ही गाडी मुख्य पुरावा असून ती अज्ञात स्थळी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचसोबत मिहीर शाहाने अपघात झाल्याची माहिती राजेश शाहांना फोनवरून दिल्यानंतर 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरने केल्याचं आपण सांगू' असा सल्ला दिल्याचंही पोलिस तपासातून समोर आलं आहे.
महिलेला फरफटत नेले आणि केले निर्दयी कृत्य
धडक दिल्यानंतर महिला गाडीच्या बंपर व चाकाच्या मध्ये अडकली होती. मिहिरने या महिलेला जवळजवळ दोन किलोमीटर वरळी सी फेस सीलिंकपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर मात्र त्याने एक धक्कादायक प्रकार केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. महिलेला फरफटत नेल्यानंतर त्याने कारच्या मध्ये अडकलेल्या महिलेला बाजूला काढले, ड्रायव्हरला गाडी चालवण्यास सांगितले व गाडी पुढे नेण्याऐवजी पुन्हा मागे घेत त्या महिलेच्या अंगावरुन नेली व तो गाडी घेऊन पळाला. आरोपीने वांद्रे कलानगर परिसरात कार आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला सोडले आणि तेथून फरार झाला. हा निर्दयी प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. मिहिरच्या चौकशीत त्याने असं का केलं, यामागील सगळा उलगडा होणार आहे.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
वरळीच्या अॅट्रिया मॉलजवळ झालेल्या या अपघातात मिहिर शाहने बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कोळी जोडप्याला उडवले. यात महिलेचा मृत्यू झाला तर नवरा थोडक्यात बचावला. कावेरी नाखवा असं मृत महिलेचं नाव असून प्रदीप नाखवा असं नवऱ्याचं नाव आहे.
कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. महिलेला मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.