मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर या गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
कल्याण ग्रामीण भागात असलेल्या १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशासाठी संघर्ष सुरु होता. सलग सहा वेळा लागलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर विकास समितीने बहिष्कार टाकून आपली एकजूट दाखवली होती. सतत ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकून शासनाला निर्णय घेण्यास समितीकडून भाग पाडण्यात आलं होतं. १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १४ गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र गावं समाविष्ट करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली नसल्याने गाव विकास समिती आणि मनसेचे आमदार राजू पाटील त्याबाबत पाठपुरावा देखील करत होते.
अखेर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश आले असून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ‘१४ गावांचा’ नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या ४ अभियंत्यांना मूळ विभागाचे काम सांभाळून या १४ गावांचे अतिरिक्त कामकाज पाहायचे आहे. भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी. दहिसर, निघू, मोकाशीपाडा, नावाळी, या गावांचा यामध्ये समावेश आहे. १४ गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला ११ तारखेपासून होणार आहे. दरम्यान, याबाबतचे आदेश निघताच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.