मुंबई : मुंबई आणि उपनगरांत रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच, पावसाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसारा ते टिटवाळा स्थानकांदरम्यान रुळांवर झाड पडल्याने लोकल सेवा ठप्प आहे. कल्याण ते कसारा दरम्यान ट्रॅकवर डोंगराची माती पडून ओएचईला आधार देणारा खांब वाकल्याची घटना घडली. पनवेल-कळंबोली परिसरात ट्रॅक पाण्याखाली गेला आहे.
मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचले. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- मध्य रेल्वेवरील कर्जत-खोपोली, कसारा येथून सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंतच धावत असून ती पुढे रद्द करण्यात आली आहे.
- भांडुप स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. याचा परिणाम मध्य रेल्वे मार्गावर झाला आहे.
- कुर्ला-मानखुर्द स्थानकात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- वडाळ्यात पाणी साचल्यानं गोरेगाव-सीएसएमटी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
- पुढचे तीन ते चार तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील ३ तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
- येत्या तीन ते चार दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ८ जुलै ते १० जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- रात्री १ ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.