Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

Rain Alerts : कोकणातही कोसळधार ‘रेड अलर्ट’ जारी

Rain Alerts : कोकणातही कोसळधार ‘रेड अलर्ट’ जारी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्घ जिल्ह्यात जोरदार पाऊस


जगबुडीने ओलांडली धोक्याची पातळी, खेड, चिपळूण, महाड, दापोली या चार तालुक्यात पुरस्थिती गंभीर


मुंबई : राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक नदी नाल्यांना पूर आले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळत असून संपूर्ण कोकणसह राज्यातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आज रेड अलर्ट जारी केला असून या भागात अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, नदी-नाले तुडूंब वाहत आहेत. पुन्हा एकदा खेड, चिपळूण, महाड ही तीन शहरे पुराच्या उंबरठ्यावर आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे.


कोकणातील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. खेड शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. या सगळ्यावर प्रशासन लक्ष देऊन असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.


रत्नागिरी-संगमेश्वर-खेड-चिपळूण आणि दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातील एसटी वाहतूकही कोलमडली आहे. यामुळे कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची देखील मोठी अडचण झाली आहे.


तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

Comments
Add Comment