महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या वर्षासाठी देशात ११३, तर राज्यामध्ये दहा मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यातील बहुतांश कॉलेजे शासकीय असतील. महाराष्ट्रात आठ सार्वजनिक मेडिकल कॉलेजे, तर दोन खासगी कॉलेजे असतील. या निर्णयाचे स्वागत क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले असले, तरीही एकाच वेळी देण्यात आलेल्या मान्यतेमुळे आश्चर्यही व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रामध्ये गडचिरोली, वाशिम, नाशिक, अंबरनाथ, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाडा-पालघर, मुंबई, हिंगोली येथे, तर देशामध्ये केरळ, त्रिवेंद्रम, बिहार, उत्तर प्रदेश, मेहसाना (गुजरात), जयपूर, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, मथुरा, राजस्थान, जुनागढ, मिरत, कन्याकुमारी, तेलंगण, वाराणसी, पाटणा, चेन्नई, प. बंगाल, कोलकाता, छत्तीसगढ, मरकापूर, अदोनी, राजस्थान, मध्य प्रदेश, बेंगळुरू, त्रिपुरा, रायपूर येथे मेडिकल कॉलेजे सुरू होतील. तेलंगणमध्ये पाच मेडिकल कॉलेजांना मान्यता देण्यात आली आहे.
गुणवंतांना अत्यल्प खर्चामध्ये मिळेल शिकण्याची संधी
कॉलेजांना मान्यता देण्यापूर्वी संबंधित यंत्रणेकडून जागा, मनुष्यबळ, रुग्णसंख्या, सामाजिक आर्थिक स्तर, लोकसंख्येमध्ये असलेले आजार, तसेच संभाव्य पटसंख्या याचा पूर्ण अभ्यास केला जातो. त्यानंतर पडताळणी प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली. सन २०२४साठी ११३ कॉलेजांना मान्यता मिळाल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शासकीय कॉलेजांमध्ये अत्यल्प खर्चामध्ये शिकण्याची संधी मिळेल. देशातून बाहेर जाणाऱ्या व तिथेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्याही कमी होईल, या भूमिकेतून हा निर्णय तातडीने घेण्यात आला असावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.