Friday, July 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजWorli Hit and Run : 'कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!'...

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा ‘तो’ कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक

कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाने (Pune Porsche Hit And Run Case) अवघ्या महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच आता वरळीतून आणखी एक अशीच धक्कादायक घटना (Worli News) समोर आली आहे. वरळीच्या अॅट्रिया मॉल परिसरात एका कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला एका कारचालकाने समोरुन धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर नवरा थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर कारचालक अपघातस्थळावरुन फरार झाला. दरम्यान, हा कारचालक शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह (Mihir Shah) आहे, तसेच कार चालवताना त्याने मद्यप्राशनही केले होते. या प्रकारामुळे आता पुन्हा एकदा राज्याचं वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पुणे पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलीस आणि गृहखात्यावर असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच मुंबईतील वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची तुलनाही पुणे पोर्शे प्रकरणाशी केली जात आहे. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पालघरचा उपनेता असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिलं जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस खात्याला दिले आहेत.

अपघातात दुचाकी चालवणारा नवरा थोडक्यात बचावला असून महिलेचा मात्र गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडीसह चालक पळून गेला आहे. अजूनही मिहीर शाह फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.”

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही.

अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकाने गाडी पळवली. त्यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -