रियाने आपल्या गोड आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. सगळ्यांना रियाचा आवाज सहज ऐकू येत होता. टाळ्यांचा कडकडाट होत होता. माईक नसतानाही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली झालेली मैफल चांगलीच रंगली.
कथा – रमेश तांबे
रिया लगबगीने घराबाहेर पडली. छान साडी नेसून, उत्तम तयारी करून ती शाळेत निघाली होती. कारण रियाचा आज शाळेत सांस्कृतिक मंडळातर्फे गीत गायनाचा कार्यक्रम होता. कमीत कमी चार गाणी रिया गाणार होती आणि वेळ मिळाला, तर अजून दोन! गेला महिनाभर ती गाण्याचा नियमित सराव करीत होती. पहिल्या चार गाण्यांत दोन मराठी गाणी होती. त्यात एक तुकोबांचा अभंग, तर दुसरं ‘साधी माणसं’ चित्रपटातलं गाणं. उरलेली दोन हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाणी होती.
सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने, बहुतेक मुलं-मुली अगदी नटून-थटूनच आली होती. शाळेचे सभागृह रांगोळ्या, फुलांच्या माळांनी छान सजवले होते. रंगमंचावर गायक-वादकांसाठी एक छोटेखानी मंच तयार केला होता. रंंगमंंचाखाली अगदी पहिल्या रांगेत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कार्यक्रमासाठी बोलावलेले विशेष पाहुणे बसणार होते. आजच्या कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत, सुप्रसिद्ध गायिका सुलभा करंदीकर यांना बोलावण्यात आले होते.
रिया शाळेत पोहोचताच, तिने वादक चमूशी ओळख करून घेेतली. थोड्याच वेळात मुख्याध्यापकांसह प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. सभागृहात शंभर- एक विद्यार्थी, शिक्षकवृंंद हजर होते. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य सळसळत होते. आयोजकांची धावपळ सुरू होती. ती सारी गडबड मोठ्या उत्सुकतेने रिया विंगेतून बघत होती. तेवढ्यात सूत्रसंचालक रंगमंचावर आल्या. पडद्यामागूनच त्यांनी आपल्या गोड आवाजात पाहुण्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले अन् लवकरच गाण्यांचा कार्यक्रम सुरू होतोय, अशी घोषणा केली. मग सर्व वादक मंडळी आणि रिया मंचावर स्थानापन्न झाली. पडदा उघडला आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रियाने सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत केले आणि गायनाला सुरुवात केली.
तुकोबांचा प्रसिद्ध अभंग ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ रिया हा अभंग तन्मयतेने गाऊ लागली. पहिले चरण संपले आणि दुसऱ्या चरणाच्या वेळी संपूर्ण ध्वनी यंत्रणाच बंद पडली. काय झाले काहीच कळले नाही. कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली; पण काही केल्या दोष सापडेना. असे करता करता अर्धा तास संपला; पण माईक काही सुरू होईना. रिया तर अगदी रडकुंडीलाच आली. या कार्यक्रमासाठी तिने भरपूर मेहनत घेतली होती. आता आपल्याला गायला मिळणार नाही, याची तिला खात्री पटली.
पण अचानकपणे प्रमुख पाहुण्या स्वतःच रंंगमंंचावर आल्या आणि म्हणाल्या, “मित्रांनो, रियाने तर उत्तम सुरुवात केली होती; पण माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण तुम्ही जर सहकार्य केले, तर गाण्यांचा कार्यक्रम आपण पुन्हा सुरू करू शकतो. आपल्याला फक्त एकच विनंती आहे की, साऱ्यांनी पुढे येऊन बसा. अगदी रंंगमंंचावर येऊन बसा. तिथे बसून आपण रियाच्या गाण्यांचा आस्वाद घेऊया.” मघापासून निराश झालेली रिया खुदकन हसली आणि लगेच मंचावर येऊन बसली. तिच्या तिन्ही बाजूंनी श्रोते बसले. करंदीकर मॅडम रियाच्या समोरच बसल्या. रियाला मॅडमच्या साधेपणाचे कौतुक वाटले. गाणं ऐकण्यासाठी त्या चक्क खुर्ची सोडून, रंंगमंंचावर येऊन बसल्या. त्यांच्याबरोबर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि श्रोते म्हणून आलेली मुलेदेखील! यामुळे मैफलीला अगदी घरगुती स्वरूप प्राप्त झाले.
रियाने आपल्या गोड आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. अगदी जवळच बसल्याने, सगळ्यांना रियाचा आवाज सहज ऐकू येत होता. अधूनमधून प्रतिक्रिया येत होत्या. टाळ्यांचा कडकडाट होत होता. रियाने पाहुण्यांच्या आग्रहाखातर अजून दोन गाणी गायली. माईक नसतानाही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली झालेली मैफल चांगलीच रंगली. कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी रियाला भरपूर आशीर्वाद दिले. तिच्या गायकीचे, आवाजाचे, तयारीचे तोंड भरून कौतुक केले आणि शेवटी म्हणाल्या, “बेटा जीवनात अडचणी येणारच; पण आपल्याला त्यावर कल्पकतेने मात करता आली पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेव.”