भक्कम, विशाल
आहे हा बहुगुणी
ध्यानस्थ बसलेला
जणू वाटे ऋषिमुनी
विषारी वायू शोषून
हा प्राणवायू देतो
पक्ष्यांचे हक्काचे
आश्रयस्थान होतो
याच्याभोवती प्रदक्षिणा
घालण्याची प्रथा
सत्यवान-सावित्रीची
सांगतो हा कथा
मुलाबाळांशी याचा
जीवाभावाचा संग
सुरपारंब्या खेळात
हाही होतो दंग
याच्या छायेत मिळते
हवा थंडगार
अनेक पिढ्यांचा हा
आहे साक्षीदार
पर्यावरण राखण्यात
सदा असतो दक्ष
या दाढीवाल्याला सारे
म्हणती वटवृक्ष
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) शाकाहारी आहे तो
खादाडही खूप
त्याचा कान म्हणजे
भले मोठे सूप
नाक एवढे लांब की
जमिनीवर लोळे
सांगा पाहू कुणाचे
चिमुकले डोळे?
२) गाय, बैल
गोठ्यात असे
घुबड, पोपट
ढोलीत दिसे
मधमाशांचे
पोळ्यांचे घर,
कोंबड्याचे घर आता
सांगा लवकर?
३) झाडावर डोलतात,
पानांशी बोलतात
टपटप उतरून
वाऱ्यासोबत चालतात
सुगंध साऱ्यांना
वाटीत बसतात
नव्या रंगरूपात
कोण बरं हसतात?
उत्तर –
१) हत्ती
२) खुराडे
३) फुले