इस्लामपूर न्यायालयाचा मोठा निर्णय
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. १६ वर्षांपूर्वी एका प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात (Islampur court) गेल्या १६ वर्षांपासून खटला सुरू होता. आता अखेर इस्लामपूर न्यायालयाने राज ठाकरेंना निर्दोष ठरवलं आहे. मनसे (MNS) पक्षाच्या स्थापनेनंतर करण्यात आलेल्या एका आंदोलनामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यानंतर, शेंडगेवाडी येथे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनेसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले होते. पण, राज यांच्या वकिलाने ते वॉरंट रद्द करुन घेतले होते.
मनसे आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यातून आता राज ठाकरे यांना इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, कायदेशीर अडचणीतून राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.