१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर
रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसचा (ST Bus Accident) भीषण अपघात झाला होता. यामध्ये नऊ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. एसटी बस अपघाताचे हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. रायगड (Raigad) येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड अलिबाग ते रेवदंडा मार्गावर नवेदर बेली येथील वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. मोठी धडक झाल्यामुळे दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. तर एसटी बसमधील १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यासोबत दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या अपघातामुळे महामार्गावर वाहतूकसेवा विस्कळीत झाली होती.