Monday, July 15, 2024

नवतारे

कथा – प्रा. देवबा पाटील

यशश्री तू मला चहा पाजलास व मला खरोखरच तरतरी आली. आता तू थकल्यासारखी जाणवतेस. आता मी तुला माझ्याजवळचा आमच्या ग्रहावरील जडीबुटींचा बनवलेला आयुर्वेदिक थकवाहारी चहा प्यायला देते. तो तू पी म्हणजे तुझा थकवा निघून जाईल. असे म्हणत, परीने खरोखरच क्षणात तिच्या पोषाखातून एक छोटीसी, सुंदरशी व नक्षीदार अशी बॅग काढली. त्यातून छोट्या छोट्या वेगळ्याच पण अतिशय सुंदर सोनेरी कपासारख्या दिसणा­ऱ्या दोन बाटल्या काढल्या. एक बाटली तिने यशश्रीला दिली व एक स्वत:च्या हाती ठेवली. परीने ज्याप्रमाणे त्या बाटलीचे झाकण उघडले, त्याचप्रमाणे यशश्रीने सुद्धा आपल्याजवळील बाटलीचे झाकण उघडले. जशी परी तो चहा पिऊ लागली, तशी यशश्रीही पिऊ लागली. तो अमृतासारखा मधुर चहा पिऊन, खरोखरच यशश्रीला खूपच ताजेतवाने वाटायला लागले. चहा पिऊन झाल्यावर परीच्या सांगण्यानुसार यशश्रीने तिचा बाटलीसमान कप परीजवळ दिला व परीला म्हणाली, “परीताई, तुम्ही आधी म्हणाल्या होत्या की, या अवकाशात तेजोमेघही आहेत. ते कसे असतात?”

परी म्हणाली, “या अवकाशातील दीर्घिकांमध्ये धूळ नि विरळ वायूचे प्रचंड मोठमोठे असे खूप ढग आहेत. ते धुरकट किंवा धुम्रमय दिसतात. तेही त्यांच्या कक्षांमधून अवकाशात सतत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असतात. त्यांच्यामुळे आकाशात धुके पसरल्याचा आभास निर्माण होतो. त्यांचा आकार आपल्या सूर्यमालेपेक्षाही खूप मोठा असतो. ते कधी नियमित आकाराचे वर्तुळाकार असतात, तर कधी अनियमित आकाराचेही असतात. त्यांपैकी जे प्रकाशित असतात, त्यांना शास्त्रज्ञ ‘तेजामेघ’ म्हणतात, तर जे प्रकाशमान नसतात, त्यांना ‘कृष्णमेघ’ म्हणतात. तेजामेघही काही ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित असतात, तर काही ग्रहांप्रमाणे परप्रकाशित असतात. कधी कधी या तेजोमेघांपासून नवीन तारेही बनू शकतात, असे वैज्ञानिक सांगतात. या तेजोमेघामध्ये एखाद्या ठिकाणी हायड्रोजनचा साठा एकत्र येऊ लागला म्हणजे त्यापासून त्या ठिकाणी तारा निर्माण होतो. ज्या तेजोमेघांमध्ये तारे असतात, ते प्रकाशमान दिसतात. ज्यांमध्ये तारे नसतात, ते काळेशार गडद असतात. म्हणूनच त्यांना कृष्णमेघ म्हणतात.”

“परीताई नवतारा व अति नवतारा या ता­ऱ्यांबद्दल मागे मी एकदा कोठे तरी ऐकले होते. ते कसे असतात?” यशश्रीने प्रश्न केला.

परी सांगू लागली, “ताऱ्यांचा मुख्य घटक हा हायड्रोजन असतो व हायड्रोजनच्या ज्वलनातून हेलियम तयार होतो. ता­ऱ्यांमध्ये या वायूंमध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असते व त्या प्रकियेमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होत असते. त्या उष्णतेवरच ता­ऱ्यांचा प्रकाश म्हणजे तेज अवलंबून असते. काही तारे हे स्वत:हून हायड्रोजनची जास्त उधळपट्टी करतात. त्यामुळे ते निस्तेज होत जातात. तेव्हा त्यांना नवतारे किंवा दीप्ततारे अथवा नोव्हा तारे म्हणतात. निस्तेज होत गेल्यामुळे, ते आकुंचन पावून बारीक होत जातात व त्यांना प्रचंड वेग प्राप्त होतो. सतत आकुंचित होत असताना, या ता­ऱ्यांच्या गर्भात एकदम स्फोट होतो. त्यामुळे त्यांचे बाह्य आवरण अवकाशात दूर फेकले जाते. त्यामुळे आतील गर्भ अत्यंत तीव्रतेने म्हणजे नेहमीच्या ता­ऱ्यांच्या दहा हजार पट जास्त तेजाने चमकतो. काही कालावधीनंतर हे स्फोट झालेले तारे पुन्हा पूर्वस्थितीत येतात. असे हे नवतारे फार कमी कालावधीसाठी दिसतात. याही नवता­ऱ्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त व अति प्रचंड स्फोट होणा­ऱ्या ता­ऱ्यांना अति नवतारे किंवा अतिदीप्त नवतारे अथवा सुपरनोव्हा तारे असे म्हणतात.”

“परीताई तुम्ही मला खूपच छान माहिती सांगता. मी खरोखरच तुमची खूपच ऋणी आहे.” यशश्री म्हणाली.
तसे काही नाही बाळा. तुला आवड आहे म्हणून मीही सांगते. उद्या आपण आणखी काही इतर ता­ऱ्यांची माहिती बघू. असे म्हणून परी जायला उठली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -