क्राइम – अॅड. रिया करंजकर
प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन काम करतात. लोक आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी गावाकडून शहरात येतात. त्याचपैकी एक होता भारत सिंग. जन्माने तो श्रीमंत होता. एका श्रीमंत कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण त्याला वेगळं काहीतरी करायचं असल्यामुळे तो गावाकडून शहरामध्ये आला. काही दिवस नातेवाइकांकडे राहून त्यांने शहरातली एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली की शहरात जर श्रीमंत व्हायचे असेल आणि नाव कमवायचे असेल तर बिल्डर लॉबी हे त्याला झटपट पैसे कमवून देऊ शकतात. म्हणून त्याने आपल्याकडे असलेला पैसा बिल्डर बनण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली. त्यासाठी मुंबई शहरामध्ये गावठण भाग त्यांनी निवडला आणि गावातल्या लोकांशी हातमिळवणी करून त्याने त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. त्यांने ज्या महत्त्वाकांक्षाने शहरांमध्ये पाय ठेवला होता ते स्वप्न पूर्ण होत आलेलं होतं. ज्या गावाने त्याला जमीन दिल्या होत्या आणि त्यावर त्यांनी इमारत उभ्या केल्यामुळे गावातील लोकांचाही फायदा झाला होता. कारण जमिनीचे पैसे त्यांना परत दिलेले होते. गावात हा परप्रांतीय येऊन बिल्डिंग बांधतो आणि मोठा होतो हे मात्र त्या गावातल्या लोकांच्या डोळ्यांत खुपत होतं.
गावात तो जिथे-जिथे बिल्डिंग बांधत होता त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गावातली लोकं अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधलेल्या इमारती पाडल्या जात होते. तरी या लोकांच्या त्रासाला न डगमगता तो बिल्डर लॉबीमध्ये पुन्हा उभा राहत होता. पण आता प्रत्येक गावात जमीनदार बिल्डर बनले होते. स्वतःच्या जमिनीवर स्वतःच्या इमारती बांधू लागले होते. त्याच्यामुळे हा परप्रांतातून आलेला तरुण त्यांना नको होता. या कारणामुळे गावातील लोक आणि भरत यांच्यामध्ये अनेकदा वादही झाले. तरी तो डगमगला नाही आणि गाव वस्तीच्या बाहेर त्याने आपल्या इमारती उभ्या केल्या. भरत आपल्या स्वप्नांच्या मागे पळत होता आणि गाववाले मात्र त्याच्या मागे पळत होते. कसंही करून भरत बिल्डर त्यांच्या अवतीभवती नको होता. भरत मात्र त्यांच्याशी प्रेमाने वागत होता कारण त्यांच्यामुळेच तो आज कुठेतरी एक बिल्डर म्हणून नावारूपाला आलेला होता.
एक सकाळ अशी आली की, तो नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये गेला आणि तो परत घरी आलाच नाही. त्याच्या ऑफिसमध्ये कोणीतरी त्याचा खून केल्याची घटना समोर आली. नेमके त्यावेळी सीसीटीव्ही बंद असल्यामुळे ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत. भरतच्या डोक्यावर आणि मानेवर मारलेल्याच्या खुणा होत्या. काही पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी भरतची पत्नी सीमा आणि त्यांच्या ऑफिस बॉयला खुणाच्या संदर्भात अटक करण्यात आली.
भरतची पत्नी पतीच्या खुनाच्या संदर्भात तुरुंगात होती पण ती पोलिसांकडे, कोर्टात सांगत होती की मी पतीचा खून केलेला नाही पण पुरावे मात्र वेगळेच काहीतरी सांगत होते. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर पोलिसांचे असे मत होते की, हिला जामीन मिळाला, तर ही बाकीचे पुरावे नष्ट करेल. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यात कुठेच स्पष्ट झाले नव्हते की, हा खून तिने केला आहे. खुनाच्या वेळी तिथे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे हाती ठोस असा पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. या कारणामुळे तिला जामीन मंजूर झाला.
पोलिसांबरोबर आता भरतची पत्नी सीमा हिची जबाबदारी वाढलेली होती. तिला स्वतःला निर्दोष मुक्त करायचं होते. त्याचबरोबर आपल्या पतीच्या खऱ्या गुन्हेगाराला समोर आणायचे होते. भरत शहरांमध्ये एक स्वप्न घेऊन आला होता. ते स्वप्न तो पूर्ण करत होता पण त्याचे स्वप्न मात्र त्याच्याच जवळच्या लोकांनी पूर्ण होऊ दिले नाही. ते स्वप्न घेऊनच तो या जगातून निघून गेला होता. त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले होते. जेव्हा आपण नाव कमवतो, पैसा कमवतो, मोठेपणा कमवतो, तेवढेच आपले दुश्मनही आपण निर्माण करतो.
(सत्यघटनेवर आधारित)