हलकं-फुलकं – राजश्री वटे
पहाटेची सूर्योदयाची वेळ…
केशरी रंगाने अवकाश भरून गेले होते!
पिवळा पितांबर जणू गगनी झळकला…
माऊली… माऊली
जय हरी विठ्ठल…
धून कानावर पडली…
आणि नजर त्या विठ्ठलाला
शोधू लागली…
दुरवरून कुठून तरी टाळ मृदंगाचा नाद कानावर येऊ लागला…
आणि दृष्टीस पडली ती दिंडी… हवेमध्ये पताका फडकत होत्या… भूमीवर नादमय लहरी उठत होत्या टाळ-चिपळ्यांच्या गजरात! हिरव्या शेतातून वाट काढत… पांढरे वस्त्र परिधान केलेले वारकरी… विठ्ठल नामाच्या जयघोषात, लयबद्ध पावलांच्या तालावर वाजत-गाजत पंढरपूरच्या दिशेने निघालेले! केशरी आसमंत! पांढऱ्या वस्त्रातील वारकरी!! हिरवं शेत!!! माझ्या मातृभूमीचा तिरंगाच जणू…
अवघा रंग एक झाला…
देवभक्ती आणि देशभक्तीचा
अनोखा दृष्टांत!
विठूचा गजर, हरीनामाचा झेंडा रोवीला…
ही भक्ती रोमारोमातून गाऊ लागली…
विठूच्या दर्शनाला आतुर वारकरी…
पावसा पाण्याची पर्वा न करता, चिखल तुडवत भक्तीमध्ये आकंठ बुडून वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडायला आसूसलेला भक्त विठ्ठल नामात गुंग होता!
लाऊनी कपाळासी गंध
तुझा लागलासी छंद!
भक्तिमय वातावरण भजन, कीर्तन, अभंग, पोवाडे, भारुड, गजर यांनी दुमदुमून गेली वाट… जी विठ्ठलाच्या चरणाशी जाऊन विसावत होती!
एकतारी संगे एकरूप झालो…
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो!
किती तन्मयतेने गात होता प्रत्येक वारकरी!!
नसानसातून भक्ती वाहत होती जणू… रोमारोमात जोष होता!!
टाळ मृदंगाच्या जल्लोषात फेर धरून थिरकणाऱ्या पावलांमध्ये दोन पावलांची भर पडली…
या शेजारणीने, बरं केलं गं बया…
मला पंढरीला नेलं गं बया!
दूरवर कळसावरील भगवा झेंडा पडला नजरेस…
दर्शनाला जीव झाला कासावीस…
गात्र न गात्र फुलून आले…
तन मन नाचू लागले…
माझे माहेर पंढरी…
माझे माहेर पंढरी…
गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी भक्तीचा जनसागर लोटला होता… वारकरी बेभान होऊन विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात न्हाऊन निघाले होते!
अबीर गुलाल उधळीत रंग…
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…
गाभाऱ्यामध्ये प्रवेश घेताच…
सगुण ही तूच…
निर्गुण ही तूच…
कमरेवरती हात ठेऊनी विटेवरी उभा…
साक्षात समोर… पांडुरंगा!
अजी म्या ब्रह्म पाहिले!!
डोळे वहायला लागले…
स्वर्ग सुखाची भेट आज ही धन्य जीवन झाले!
बोलू लागली फक्त नजर…
तुझ्या माझ्या नात्यात एक करार झाला होता… साकडं पूर्ण करावयास आलो…
विठ्ठला… विठ्ठला…
आर्त साद अंतर्मनातून!
आणि अचानक डोळे उघडले…
स्वप्नातच वारी झाली म्हणायची…
दोन वर्षे तुझी कवाडे बंद होती… कसलं संकट आलं होतं रे बाबा… जीव तरसून गेला होता तुझ्या दर्शनाला… काय परिस्थिती निर्माण झाली होती रं देवा… वारीत वाजणारे मृदंग अबोल जाहले होते, विठ्ठल गर्जणारे जयघोष गहाल जाहले होते! पण ठाऊक होते तू इथेच होतास… रंजल्या गांजल्याची सेवा करत… कधी डॉक्टरच्या रूपात, कधी दानी म्हणून, कधी सेवेकरी म्हणून… किती रूपं घेतलीस विठ्ठला… जिथं तिथं दिसलास तू… पण आरिष्ट निवले रे बाबा लवकर…
आणि मन गाऊ लागलं पुन्हा…
आनंदाचे डोही आनंद तरंग
पांडुरंग हरी!
वासुदेव हरी!!