विशेष – भालचंद्र ठोंबरे
नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा पुत्र होता. तो त्याच्या कालखंडातील पृथ्वीवरील सर्वात शूर पराक्रमी व मोठा धार्मिक राजा होता. इंद्र देवाने त्वष्टा नावाच्या ऋषीच्या त्रिशिरा नामक मुलाचा वध केल्याने, इंद्राला ब्रह्म हत्येचे पातक लागले. या पातकातून मुक्त होण्यासाठी, इंद्र मानसरोवरातील कमळाच्या फुलाच्या देठात लपून तप करीत होता. इंद्राने स्वर्गलोक सोडल्याने, दैत्त्यानी इंद्र लोकावर स्वारी करून, देवांना त्रस्त केले. भयभीत झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना भूतलावरील धर्मात्मा राजा नहूष यास इंद्रपदी बसविण्याचा सल्ला दिला.
इंद्राचा कोणालाच पत्ता नसल्याने व इंद्रप्रस्थ रिक्त असल्याने सर्व देवता, ऋषी इत्यादींनी ब्रह्मदेवाच्या सल्ल्यावरून भूतलावरील राजा नहूष यास इंद्रपद स्वीकारण्याची विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन, नहुषाने इंद्रपद स्वीकारले. त्याने देवांना त्रास देणाऱ्या दैत्यांचा पराभव करून, त्यांच्यावर वचक निर्माण केला. त्याच्या या कार्यामुळे देव, ऋषी समाधानी होते. भूतलावर धर्माचरण करणारा नहूष स्वर्गातील सुखासीन जीवनक्रमामुळे आळसावला. सत कर्माचा त्याला विसर पडला. तो ऐषारामी, सुखलोलूप व गर्विष्ट झाला. तशातच त्याचे लक्ष इंद्र पत्नीकडे गेले. आता आपण इंद्र असल्याने, इंद्राणीने आपल्याला पती म्हणून स्वीकारावे, असा हट्ट तो धरू लागला. त्याच्या या कृत्याला घाबरून इंद्र पत्नी शची ब्रह्मदेवाकडे गेली व तिने नहुषाच्या वागणुकीची कल्पना देऊन, आपले रक्षण करण्याची ब्रह्मदेवाला विनंती केली. ब्रह्मदेवाने तिला धीर दिला व संरक्षणाची हमी दिली. तसेच नहुषाला अद्दल घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी शचीला नहुषाचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारीत असल्याचे कळविण्यास सांगितले. मात्र आपण मला भेटण्यासाठी, सप्तऋषींनी वाहून आणलेल्या पालखीतून यावे, असेही सुचविण्यास सांगितले. शचीने त्याप्रमाणे नहुषाकडे निरोप पाठविला.
इंद्र पत्नी शचीचा निरोप मिळताच, हर्षित झालेल्या नहुषाने ब्रह्मर्षी ऋषींना बोलवून, पालखी उचलण्यास सांगितले. ऋषी पालखी घेऊन जाऊ लागले; परंतु शचीला भेटण्याच्या कल्पनेने उतावीळ झालेल्या नहुषाने समोरच्या बाजूला असलेल्या अगस्ती ऋषींना लाथ मारून सर्प (म्हणजे लवकर चला) चालण्यास सांगितले. लाथ लागल्याने अगस्ती ऋषींना क्रोध आला, त्यांनी राजाला तू हजार वर्षं सर्प म्हणजे साप होऊन भूतलावर पडशील, असा शाप दिला. तेव्हा नहुषाने अगस्ती ऋषींची क्षमा मागून, शाप निवारण करण्याची विनंती केली. तेव्हा जो तुझ्या प्रश्नांची योग्य रीतीने उत्तरे देईल, तोच तुझा मुक्तिदाता असेल, असे सांगितले. शापामुळे राजा नहुष सर्प योनीत अजगर होऊन पृथ्वीतलावर पडला.
द्वापार युगात पांडव वनवासात द्वैत वनात असताना, अन्नाच्या शोधात गेलेला भीम अजगररूपी नहुषाच्या जवळ आला. सर्प रूपातील नहुषाने भीमाला आपल्या वेटोळ्यात घट्ट जखडले. अन्नाच्या शोधात गेलेल्या भीमला उशीर होत असल्याचे पाहून, युधिष्ठिर त्याच्या शोधात निघाला. तेव्हा त्याला पराक्रमी भीम अजगराच्या विळख्यात असहाय्य झालेला दिसला. महापराक्रमी भीमाला असहाय्य पाहूनच, हा सर्प कोणी तरी शापित देव गंधर्व अथवा मुनी असावा, असा युधिष्ठिराने तर्क केला व आपण कोण असा प्रश्न अजगराला केला. तेव्हा अजगर मनुष्यवाणी बोलू लागला व म्हणाला, “मी कुरू वंशातील नहूष असून, भीमाला आता मी भक्षण करणार आहे,” असे सांगितले. धर्मराज सर्परूपी नहुष राजाला म्हणाला आपण आमचेच पूर्वज असल्याने, अशा प्रकारे करणे योग्य होणार नाही. या बोलण्यावर प्रसन्न होऊन अजगररूपी नहुष म्हणाला, तुला भीमाला वाचवण्याची एक संधी मी देत आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास, मी भीमाला मुक्त करेल, असे सांगितले. त्यानुसार सर्परूपी नहुषाने विचारलेल्या प्रश्नांची युधिष्ठिरने योग्य उत्तरे दिली. त्याचवेळी युधिष्ठिरानेही नहुषाला विचारलेल्या प्रश्नांची नहुषाने समर्पक उत्तरे दिली. या धार्मिक चर्चेमुळे अजगररूपी राजा नहुुुुुषाने भीमाला मुक्त केले व तोही सर्प योनीतून मुक्त झाला.
तात्पर्य : स्वतःच्या शक्तीचा किंवा पदाचा गर्व करून इतरांशी उद्धट वर्तन करू नये. तसे केल्यास तो कितीही मोठा असला, तरी परिणामाला सामोरे जावे लागते.