Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजहेमाडपंती मंदिरे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

हेमाडपंती मंदिरे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना

विशेष – लता गुठे

भारतीय स्थापत्यकला हा माझा अतिशय उत्सुकतेचा आणि आवडता विषय असल्यामुळे जिथे जिथे जाते, तिथे असलेली जुनी मंदिरे व वास्तू पाहणे मला जास्त आवडते. नुकतीच मदुराई, कन्याकुमारी येथे जाऊन आले. तेथे पाहिलेली मंदिरे हे त्या प्रवासातील आकर्षणाचे विषय होते. त्यामुळे जरा इतिहासात डोकावून वास्तुकलेचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. जेव्हा वास्तुकलेविषयी वाचू लागले, तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. ज्या मलाही माहिती नव्हत्या. आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. लहानपणी आमच्या गावांमध्ये दगडात कोरलेले संपूर्ण दगडाचा वापर करून बांधलेले शिवालय हे जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासून मी पाहत आले आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे, इथे उन्हाळ्यात गर्मी होत नाही किंवा हिवाळ्यात थंडी वाजत नाही. या मंदिरासाठी दगडांच्या व्यतिरिक्त कुठल्याही धातूचा किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. एक दिवस वडिलांना मंदिराविषयी विचारलं, तेव्हा ते म्हणाले… हे मंदिर हेमाडीपंथीयांच्या काळातील आहे. भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांची सत्ता होती. हा सुवर्णकाळ मानला जात असे. इ. स. १२६०  ते इ. स. १३०९ या काळामध्ये हेमाद्री पंडित उर्फ हेमाडपंत हे प्रधान होते. ते शिवभक्त असल्यामुळे, त्यांनी त्या काळी अनेक शिवालये बांधली. अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना हेमाडपंती प्रकारातले मंदिर असे म्हणतात. यांनी हेमाद्री व्रत हे व्रतांची माहिती असलेला ग्रंथ रचला. तसेच मोडी लिपीचाही शोध लावला. त्यामुळे त्यांची कल्पकता, बुद्धिमत्ता प्रतिभा ही अलौकिक स्वरूपाची होती, हे लक्षात येते.

हेमाडपंती यांनी बांधलेली जुनी मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावा-गावांमध्ये पाहायला मिळतात. पैठण जवळच असलेल्या घोटण या गावी मलकाअर्जुन हे मंदिर दुरून दिसणारा उंच कळस जवळ गेलं की, त्याची भव्यता जाणवते. सभामंडप व मंदिराच्या भिंतींची वैशिष्ट्यपूर्ण रचना असल्यामुळे, हे मंदिर अतिशय अलौकिक अनुभव देऊन जाते. या मंदिरामध्ये खाली खोल गाभारा आहे. निमुळत्या दगडी रस्त्याने अंधारात प्रवेश करून, पिंडीपर्यंत पोहोचता येते. भिंतीवर कोरलेल्या मूर्ती आजही उत्तम अवस्थेत आहेत. तसेच मी पाहिलेले एक मंदिर अंबरनाथ येथील आहे. हे मंदिर प्रचंड भव्य असे आहे. ते पाहिल्यानंतर थक्क व्हायला होते. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा सिमेंट न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसवून कोणा कोणा जोडून भव्य बांधकाम केले जाते. मंदिरांसारख्या पायापासून शिखरापर्यंत दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे सांगतात येतील.

हेमाडपंती ही पुरातन स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा उपयोग करून वास्तू तयार केल्या, त्याला त्यांनी ‘हेमाडपंती’ असे नाव दिले, या नावावरून तशाच पद्धतीच्या आणखी वास्तू बांधल्या. त्यामुळे त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गावा-गावांमध्ये मंदिरे बांधणे, हे सामाजिक संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग होते, कारण धर्माचे आचरण करण्यासाठी, सर्वांनी एका ठिकाणी येऊन, आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी मंदिरे बांधली जात असत.

हेमाडपंती मंदिराच्या या विशिष्ट स्थापत्य शैलीला ‘शुष्कसांधी स्थापत्यशैली’ असे देखील म्हणतात. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहते आणि टिकाऊही बनते. साधारण मंदिराची रचना खालीलप्रमाणे असते-गर्भागृह, ज्यामध्ये मंदिरातील मुख्य देवता स्थानापन्न केलेली असते. तंतोतंत त्याच्या वरील उंच भागाला ‘विमाना’ म्हणतात आणि त्याच्यावर शिखरा बसवलेला असतो. गर्भागृहाच्या समोर जो मंडप असतो, तो बहुतांश चार खांबांवर उभा असतो आणि वरील छतही दगडांचेच बनवलेले असते. भारतीय वास्तुकला ही अतिशय जुनी वास्तुकला आहे.

हेमाडपंती शैलीतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिरे यामध्ये वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील काही मंदिरे, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर, कोल्हापूरच्या अंबाबाई  मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, मुशिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, अमृतेश्वर शिवमंदिर नगर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर  इत्यादी मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून, ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की, त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुसऱ्याचा आधार मिळून, छत बिनधोक राहू शकते. अशी मंदिरे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात व चौदाव्या शतकात बांधली गेली. हेमाद्री किंवा हेमाडपंत याने या पद्धतीचा पुरस्कार केला म्हणून त्याच्या नावाने ही बांधकाम शैली ओळखली जाते. गाभारा चौकोनी व सभामंडपाला अनेक अलंकृत कोरीव खांब असतात. खांबांवर व छतावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून, सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजन मंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते, बाहेर बसण्यासाठी चबुतरे तयार केलेले असतात. एकाच रंगात असल्यामुळे, ते दिसायला अतिशय सुरेख दिसते. देवालये पूर्वाभिमुख असतात. अशा देवालयांवर प्राचीन शिलालेख आढळतात.

हेमाडपंती शैलीची मंदिरे जंगलात, पठारावर किंवा गावात, नदीकाठी कुठेही आढळतात. दोन दगडांच्या मध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करून, इतर कोणताही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करून मंदिरे बांधण्याची कला त्या वास्तुविशारदाने प्रचलित केली.

हेमाडपंती देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात; पण याला एक अपवाद आहे. नाशिकजवळ धोडांबे या गावी असलेल्या विष्णू मंदिराचा. गावाच्या मध्यावर मोकळ्या जागेत एकाला एक लागून शिव मंदिर व विष्णू मंदिर आहे. विष्णू मंदिरात स्त्रियांची शिल्पे असली, तरी ती शृंगारिक नाहीत. ती आहेत-हाती शस्त्रे घेऊन लढायला सज्ज असलेल्या स्त्रियांची! काही वीरांगना घोड्यांवर, उंटांवर तर काही हत्तींवर आरूढ झालेल्या आहेत. त्या शिव शक्तीचे प्रतीक आहेत. मंदिरातील दगडातील अप्रतिम नक्षीकाम थक्क करणारे आहे. असा हा भारतीय वास्तुकलेचा प्रतिभासंपन्न वारसा म्हणून हेमाडपंती वास्तुकलेचा नमुना आहे.

हजारो वर्षांच्या इतिहासाला साक्षी असलेली ही मंदिरे आपल्या संस्कृतीचाही वारसा सांगतात. ना. धो. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर… “अलौकिक सौंदर्याने शीघोषिघ भरलेली एक स्वप्नशाळा.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -