भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प
खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने महाराष्ट्रभर (Maharashtra Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अशातच शहापूर तालुक्यातही पावसाने जोरदार पावसाची हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसामुळे शहापूरची तुंबई झाली आहे. शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला (Bharangi River) पूर आला. त्यामुळे जवळच असलेल्या इमारती खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. त्यासोबत खर्डी येथील बागेचा पाडाजवळ मे/जून महिन्यात बांधण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
स्थानिकांकडून प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित
शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. मागील महिन्यात बांधण्यात आलेला पूर वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच आटगाव- आसनगाव स्थानकादरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक १ तासापासून ठप्प झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहापूर जलमय झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
त्याचबरोबर, भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचून रहिवाशांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक संतोष शिंदे, भानुदास भोईर व अविनाश थोरात यांनी केली आहे.