Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमेरे दिलपे उन्हें इख्तियार आज भी हैं...

मेरे दिलपे उन्हें इख्तियार आज भी हैं…

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

इंग्रजी सिनेमाच्या कथा थेट चोरणे, कधी त्यांचे बेमालूम रिमेक करणे, त्या अभिनेत्यांची हुबेहूब नक्कल करणे, आपल्या वातावरणाशी विसंगत असूनही तशाच वेशभूषा करणे हे सगळे आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहे. अतिशय लोकप्रिय ठरलेला राज कपूरही चक्क चार्ली चॅपलीनची कॉपी करत होता, हे अनेकांना माहीत होते.

मुकुल आनंद यांनी दिग्दर्शित केलेला १९८५ सालचा ‘ऐतबार’ हा सुद्धा असाच एक सिनेमा. तो प्रसिद्ध रहस्यपट निर्माते अल्फ्रेड हिचकॉक यांच्या १९५४ साली येऊन गेलेल्या ‘डायल एम फॉर मर्डर’वर आधारित होता. सिनेमा बरा चालल्यामुळे, लगेच त्याची ‘सावी’ नावाची तमिळ आवृत्ती निघाली, तर १९८९ला ‘न्यू इयर’ या नावाने मल्ल्याळम् आवृत्ती आली.
राज बब्बर आणि डिम्पल कपाडिया या जोडीबरोबर होते-सुरेश ओबेरॉय, डॅनी डेंगझोंपा, अनुपम खेर आणि शरद सक्सेना. सिनेमाचे नाव जरी ‘एतबार’ म्हणजे विश्वास असे असले, तरी सगळी कथा ही संशय, विश्वासघात, लोभीपणा, ब्लॅकमेलिंग आणि खुनाच्या कटाची होती.

नेहाच्या (डिम्पल) संपत्तीसाठी जयदीप (राज बब्बर) तिच्याशी लग्न करतो. मात्र पुढे त्याला तिच्यापासून सुटका हवी असते. आपल्या पत्नीचे सागर नावाच्या मित्राशी अनैतिक संबंध आहेत असे सांगून, तिचा खून करण्यासाठी, मारेकरी नेमण्याचा प्रयत्न करतो. तो गुन्हेगार जेव्हा तयार होत नाही, तेव्हा जयदीप त्यालाही त्याच्या इतर गुन्ह्यांबद्दलचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे सांगून ब्लॅकमेल करतो. शेवटी तो तयार होतो. मात्र अचानक गडबड होऊन, स्वत:चा जीव वाचवताना, नेहाच्या हातून खुन्याचाच खून होतो. जयदीपने तिच्यावर ब्लॅकमेलरचा जाणीवपूर्वक खून केल्याचा खटला भरला जावा, अशी व्यवस्था करून ठेवलेली असते. त्याला यश येऊन, तिला जन्मठेप होते.

प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर बरुआ (डॅनी) यांना सर्व प्रकरणात काही तरी चुकीचे होत असल्याचा संशय येतो. ते सत्य शोधून काढतात. आपले पाप उघडे पडल्यावर जयदीप आत्महत्या करतो आणि नेहाची निर्दोष सुटका होते, अशी ही सुखांत कथा. यात जयदीपची आत्महत्या हा भाग म्हणजे हिचकॉकच्या मूळ कथेपासून घेतलेली फारकत होती. हिचकॉकच्या कथेतील टोनी वेन्डीस हे पात्र आपला गुन्हा उघड झाल्यावर ते स्वीकारते, असे दाखवले होते.

खुनी व्यक्तीला गुन्ह्यासाठी तयार करताना, त्याला जी खोटी कथा जयदीपने रचून सांगितली असते, तिचा आधार असतो. तिची कॉलेज जीवनातली सागर (सुरेश ओबेरॉय) बरोबरची अयशस्वी प्रेमकहाणी.

त्यांच्या त्याच पहिल्या प्रेमाच्या उत्कंटतेवर एक अतीव सुंदर गाणे गीतकार हसन कमाल यांनी रचले होते. कुणाला लवकर खरेच वाटणार नाही की, गाण्याला संगीत बप्पी लाहिरी यांचे होते. कारण पाश्चिमात्य संगीत आणि उडत्या चालीची गाणी यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बप्पीदांनी गाण्याला अगदी वेगळे संगीत दिले होते. भूपेंद्र सिंग आणि आशाताईंची निवड करून, त्यांनी आपले कौशल्य अजून स्पष्टपणे सिद्ध केले होते. आजही अनेकांच्या ओठावर असलेल्या त्या गाण्याचे शब्द होते –

‘किसी नजरको तेरा इंतजार आज भी हैं.
कहाँ हो तुम के ये दिल बेकरार आज भी हैं.’

पहिले प्रेम कधीही विसरले जात नाही, असे म्हणतात. त्याचे कारण जसे सुरुवातीचे स्वच्छ, निरागस, निर्मळ मन हे असते; तसेच हेही असते. त्यावेळी प्रेम केवळ एक भावना नसते. मनुष्य यौवनात येतो, तेव्हा त्याच्या शरीर आणि मनात अनेक नैसर्गिक बदल घडून येत असतात आणि ते त्या व्यक्तीचे सगळे मानसिक विश्व बदलून टाकतात. त्यामुळे त्या अवस्थेत ज्या व्यक्तीविषयी अनिवार ओढ निर्माण झाली होती, ती आयुष्यभर लक्षात राहतेच. कारण आपल्या व्यक्तिमत्त्वातील मोठ्या बदलाशी त्या व्यक्तीची आलेल्या संबंधाची किंवा तिच्याबद्दल त्यावेळी निर्माण झालेल्या अत्यंत नैसर्गिक ओढीची आठवण जोडली गेलेली असते म्हणून माणसाच्या मनातले पहिले प्रेम शेवटपर्यंत जिवंत असते.

सागर एक गायक असतो. तोही आपले पहिले प्रेम विसरलेला नाही. हसन कमाल यांनी गझलेत उपमांचीही कमालच केली होती. सागर म्हणतो, “ज्या सुंदर परिसरात, ज्या प्रसन्न वातावरणात आपण भेटलो होतो, तिथेच मी माझ्या प्रेमाची कबर बांधून आलो आहे. आजही ती तशीच तिथे आहे. प्रिये, तिला अजूनही तुझ्या परतण्याची प्रतीक्षा आहे.”

‘वो वादियाँ, वो फिज़ाएँ,
के हम मिले थे जहां,
मेरी वफ़ाका वहीपर मज़ार आज भी हैं.
किसी नज़रको तेरा इंतज़ार आज भी हैं.’
योगायोगाने जेव्हा सागर आणि नेहाची पुनर्भेट होते, तेव्हा त्याला जाणीव होते की, अरे माझ्या मनात तर हिच्याबद्दलचे प्रेम अजून ताजेच आहे. तिच्या नुसत्या दर्शनाने मन किती आतुर झाले. म्हणजे अजूनही हिची केवढी हुकूमत माझ्या मनावर चालतेय-

ना जाने देखके क्यूँ उनको, ये हुआ एहसास,
के मेरे दिलपे उन्हें इख्तियार आज भी हैं.
किसी नज़रको…
यावरचे कडवे कमाल यांनी नेहासाठी लिहिले होते. तिलाही लग्नानंतर जयदीप ज्याप्रकारे वागवतो, त्यामुळे प्रचंड निराशा आलेली आहे. आधी सागरने तिच्याशी लग्नाला नकार दिला होता आणि आता जयदीपने तिला तुच्छतेने वागवणे, फसवणे सुरू केले! त्यामुळे तिचे प्रेम एखाद्या घायाळ होऊन रस्त्यावर पडलेल्या पक्ष्यासारखे झाले आहे, अशी तिची खंत आहे. आशाताईंच्या आवाजात हे सगळे फार प्रभावीपणे व्यक्त झाले होते –

‘वो प्यार जिसके लिए
हमने छोड़ दी दुनिया,
वफ़ाकी राह में घायल वो प्यार आज भी हैं.’
सागर तिची अवस्था बघून दु:खी होतो. तो तिला घटस्फोटाचा सल्ला देतो. यावरच्या तिच्या प्रतिसादामुळे त्याला पुन्हा आपल्या जीवनात काही चांगले घडू शकेल, अशी आशा वाटू लागते म्हणून त्याचे शब्द येतात –

‘यकीं नहीं हैं मगर आज भी ये लगता हैं,
मेरी तलाशमें शायद बहार आज भी हैं.
किसी नज़रको तेरा इंतज़ार…’
नेहाने प्रेमात दोनदा धोका खाल्ला आहे. ती आतून पार खचली आहे, त्यामुळे तिचे शब्द येतात –

‘ना पूछ कितने मोहब्बतके जख्म खाए है.
के जिनको सोचके दिल सोगवार
आज भी है.’

मला प्रेमात इतक्या जखमा सहन कराव्या लागल्या की, मन अजूनही व्यथित आहे, असे ती म्हणते. मात्र दोघांमधले उभयपक्षी प्रेम शिल्लक आहे, नवी आशा अंकुरते आहे म्हणून गाणे संपते, ते एका आशादायी सुरावर –
‘किसी नज़रको तेरा इंतज़ार आज भी हैं.

कहाँ हो तुमके ये दिल बेकरार
आज भी हैं.
किसी नज़रको तेरा…’
पहिल्या प्रेमाची कहाणी कधी संपत नसतेच. त्या एका व्यक्तीच्या परतण्याची आशा आणि रस्त्याकडे लागलेल्या नजरेतली प्रतीक्षा शेवटपर्यंत शिल्लक असते. डोळ्यांसमोर एखादा चेहरा तरळतो आणि अशी मनस्वी गाणी याच सार्वत्रिक भावनेचे प्रत्यंतर प्रत्येकाला आत कुठे तरी खोलवर करून देत असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -