बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात छोटेसे किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे एका डॉक्टराने मध्यरात्री सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे महिलेने त्याला नकार दिला असता डॉक्टर ग्राहकाची तळपायातली आग मस्तकात गेली. महिलेचा नकार ऐकून संतत्प झालेल्या डॉक्टरने महिलेला गंभीर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या डॉक्टराने महिलेला विवस्त्र करुन मारहाण (Crime) केल्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा या घटनेमुळे हादरुन गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यात जळगाव जमोद तालुक्यात राहणारी एक महिला किराणा मालाचे एक छोटे दुकान चालवते. हे दुकान महिलेच्या घराला लागूनच असल्यामुळे गोविंद वानखेडे या नामांकित डॉक्टराने मध्यरात्री तीन वाजता महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला आणि तिच्याकडून एक सिगारेट आणि चहाची मागणी केली. परंतु आता फार उशीर झाला आहे, तुम्ही उद्या या असे महिलेने सांगितले. डॉक्टराला सिगारेट आणि चहा न दिल्यामुळे डॉक्टरला राग अनावर झाला. त्याने महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासोबत महिलेचे कपडे फाडून तिला विवस्त्र देखील केले.
या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, जळगाव जामोद शहरात आरोपी डॉ.गोविंद वानखेडे याचे वानखेडे हॉस्पिटल आहे. पोलिसांनी या नराधम डॉक्टरावर भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र सध्या आरोपी डॉक्टर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.