Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलस्त्रीजन्मा तुझी कहाणी...

स्त्रीजन्मा तुझी कहाणी…

हृदयी नयनी पाणी जन्मोजन्मीची ही कहाणी, स्त्री ही बंदिनी…

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

साधारण १३ वर्षांची मीरा धावतच आईकडे आली आणि आईला येऊन बिलगली. मीराने रडून डोळे लाल केले होते. आईला काही सांगायला तयार नव्हती. असे काय घडले असेल असा आईच्या मनात प्रश्न निर्माण झाला.

निसर्गतः स्त्रीला देवाने एक देणगी बहाल केली मातृत्वाची. जेव्हा ती कुमारिका किशोरवयीन होते तेव्हा आपण तिला शहाणी, जाणती किंवा मोठी झाले असे म्हणतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीमध्ये वडीलधारी माणसं आता जपून राहायचं, असं सांगून तिच्या खेळण्या-बागडण्यावर बंधन घालतात. खिदळू नकोस, तू मुलगी आहेस! आता मोठी झालीस, सातच्या आत घरात यायचं, लांबलचक कपडे घालायचे, जास्त कोणाशी बोलायचं नाही, मैत्री सांभाळून करायची वगैरे अनेक सूचना दिल्या जातात. नवनव्या बदलांना सामोरे जात असताना तिला तिचं जीवन सावरायचं, मनाला जपायचं असतं. मनातील भीती, कारुण्य, नैराश्य बाजूला ठेऊन तारुण्याचे पडसाद शरीरातील, मनातील आंदोलने, बदल, घडामोडी हे स्वीकारण्यासाठी तिला सहाय्य केले पाहिजे. प्रत्येक स्त्रीला यातूनच जावं लागतं. त्यावेळी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे आई असते.

मुलगी वयात आली की तिचे चांगले स्थळ पाहून लग्न लावले जाते. तरीही तिच्या आयुष्याचे प्रश्नकोडे संपतच नाहीच. दररोज नेमून दिलेली कामे प्रत्येक स्त्रीला नेमाने करावीच लागतात. घरातल्यांची मायेची सावली बनून सर्वांना प्रेमाने सामावून ती घेत असते. नंतर तिच्या आयुष्यात येतं ते म्हणजे मातृत्व. मातृत्व हे फार मोठे वरदान आहे. त्यासाठी खूप सहनशीलता लागते. स्त्रीच्या आयुष्यातील अनमोल नातं गुंफणारं, तिच्या आयुष्यात तिला गुंतवून ठेवणारं, गोड निरागस गोजिरवाणं बाळ तिच्या मांडीवर येत. तेव्हा सर्व दुःखाची सुखात रूपांतर होतात. त्याच्या आगमनाची चाहूल लागताच आईला दुःखत प्रसंगातून सुखावणारा, हवाहवासा प्रसंग देतात. मग त्या बाळंतीणीला संगोपन, बालपण, पालनपोषण करता करता बाळ मोठे होऊ लागते. शरीरात होणारे परिवर्तन, मनात उठणार काहूर या काळजाच्या तुकड्यासाठी जगू लागतात. आयुष्याचं तो अविभाज्य भाग होतो. त्याला मोठं करता करता मुलं मोठी होऊन जातात आणि मातेला प्रौढत्व येते कळतच नाही. ती जबाबदारी असते आणि जबाबदारीने संस्कार, आकार घेतात. मातीच्या निराकार गोळ्याला जसं आकार द्यावा तसं आई बाळाला संस्काररूपी आकार देत असते. ती माऊली पुढे जाऊन तिच्या आयुष्यात एक टप्पा येतो तो म्हणजे रजोनिवृत्तीचा!

सतत बदलणारे, क्षणोक्षणी रडवणारे मूड हार्मोन्स बदलामुळे तिच्या मनात होणारी चलबिचल, चंचलता, अस्थिरता, अस्वस्थता, क्षणात उद्भवणारे भय, चिंता,नैराश्य, दडपण सुरू होते. सर्वांना आवडती होण्यासाठी स्वतःची ती मात्र नावडती होते. ती स्त्रीच असते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रथम टप्प्यात स्व जाणीव, स्व प्रतिमा, स्वतःवरील अढळ विश्वास, प्रेम, कर्तव्यदक्षता हे सगळं तिच्याकडे असतानाही ती कोलमडून जाते. कित्येक व्यक्तिमत्त्व घडविणारी ती एक शिक्षिका असते. कित्येक नात्यांची घट्ट वीण विणणारी ती विलक्षण कलाकार असते. या कलाकृतीने स्वतःसह इतरांचा आयुष्य इंद्रधनुष्य रंगीबेरंगी करते. कधी सुगंधित करते. ती स्वतः जेव्हा कोलमडते तेव्हा तो रजोनिवृत्तीचा कठीण काळ असतो. या काळात तिला अनेक यातना, वेदना किंवा प्रसंगांना सामोरे जावे लागते. तिला अपेक्षा असते आपल्या माणसांची. भावनिक आधाराची, साथ सोबतीची, प्रत्येक वेळेला समजून घेण्याची. प्रत्येक क्षण, साऱ्या जबाबदाऱ्या ती आनंदाने स्वीकारते.

जेव्हा ती आजारी पडते तेव्हा तिला समजून घेणे गरजेचे असते. ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पण त्याला सर्वांना तोंड द्यावे लागते. आजपर्यंतचा हा आणि जीवनाचा वेदनादायी प्रवास तिच्या अस्तित्वाचा, तिच्यातील तिचा, अस्मितेचा, तिच्या इतरांसाठीच्या समर्पणाचा, तिच्या श्वासांचा, कर्माचा, तिने बजावलेल्या कर्तव्याचा, सामर्थ्याचा, भूमिका आणि उदात्त समर्पणाचा प्रवास! आयुष्यावर या टप्प्यावर मागे वळून पाहिलं तर खूप काही मिळाले तरी खूप काही हवं होतं! ही हुरहुर, खंत, खिन्नता इतरांसारखी तिच्यातही असते. साऱ्या सुखाची उधळण करत आपली रीती ओंजळ करून गेल्याचा वनवासी प्रवास. बाई पण भारी बिरी काही नाही. तरी बाई पण “खास’’ आहे. त्यासाठी बाई होऊन बघा. बाई जगून बघा. देवालाही प्रश्न पडतो की मी निर्माण केलेली कलाकृती इतकी शक्तिशाली! सामर्थ्यशाली!! कशी असते?

ती शक्ती, भक्ती, तृप्ती
ती स्नेहल, शितल, मंगल
ती जाण, दान, मान
ती कर्तृत्वशालिनी, यशस्विनी तेजस्विनी
ती वेदना, करुणा, ललना असतील आपल्या आसपास अशा रजोनिवृत्तीच्या काळात संवेदनशील महिलांना निश्चित सांभाळा. तो महत्त्वाचा टप्पा असून प्रत्येकीला या टप्प्यातून जावंच लागतं. “अभिमान है तेरा, तुम नारी हो, तुम सबसे भारी हो”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -