गोगो काका अर्थात गोविंद गोडबोले. मुलांमध्ये मूल होऊन जगणारे, त्यांच्यासाठी विविध साहित्य संपदा निर्माण करणारे, सर्वांमध्ये मनसोक्त मिसळून गप्पागोष्टी करणारे गोगो काका सर्वांचे लाडके. आजवर बालकांना, पालकांना, शिक्षकवर्गाला आणि समाजाला त्यांनी आपल्या मनोरंजक व उद्बोधक साहित्यामधून खिळवून ठेवण्याचे काम केले.
ओंजळ – पल्लवी अष्टेकर
गोगो काका अर्थात गोविंद गोडबोले काका. मुलांमध्ये मूल होऊन जगणारे, त्यांच्यासाठी विविध साहित्य संपदा निर्माण करणारे, सर्वांमध्ये मनसोक्त मिसळून गप्पागोष्टी करणारे गोगो काका सर्वांचे लाडके आहेत. आजवर बालकांना, तसेच त्यांच्या पालकांना, शिक्षकवर्गाला आणि समाजाला त्यांनी आपल्या मनोरंजक व उद्बोधक साहित्यामधून खिळवून ठेवण्याचे काम केले. गोगो काका बालनाट्य, नाटक, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. भारतीय आकाशवाणी केंद्रातून निवृत्त झाल्यावर देखील त्यांचे लेखनकार्य अविरतपणे सुरू आहे.
गोगो काकांसोबत माझा परिचय अनेक वर्षांपूर्वीचा. काॅलेजात असताना मी सांगली आकाशवाणी केंद्रात अंदाजे वर्षातून दोनदा ते तीनदा कथाकथनाचे कार्यक्रम करण्यास जायचे. तेव्हा कार्यक्रमांचे रेकाॅर्डिंग करण्यास गोगो काका असायचे. रेकाॅर्डिंगसाठी येणाऱ्या लोकांसोबत ते आदराने बोलायचे. त्यांची आपुलकीने चौकशी करायचे. काहीवेळेस आजूबाजूच्या गावांतून काही मंडळी भजनाचा, कीर्तनाचा किंवा गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी आपला वाद्यवृंद घेऊन यायचे व त्यांचा गाण्याचा कार्यक्रम असायचा. या सर्व मंडळींना शिस्तीत रेकाॅर्डिंगला रेकाॅर्ड रूममध्ये घेऊन येणे, त्यांचा कार्यक्रम व्यवस्थितपणे रेकाॅर्ड करणे हे कौशल्याचे कामही गोगो काका सहजतेने करत. आपली एक आठवण सांगताना गोगो काका म्हणतात, “एकदा आकाशवाणीमध्ये माझा वेगवेगळ्या लोकांसोबत छत्तीस वेळा चहा पिऊन झाला. त्या दिवशी मी छत्तीस रेकाॅर्डिंग रेकाॅर्ड केली होती. तेव्हा इतक्यांदा चहा पियालो म्हणून मी काहीसा चिंतित झालो व त्यानंतर जवळजवळ वर्षभर मी चहा पिणे सोडले.”
अलीकडेच मे महिन्यात बालनाट्याच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोगो काका मुंबईत आले होते. तेव्हा मी त्यांना आमच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्यानिमित्ताने त्यांच्यासोबत प्रत्यक्ष गप्पा करण्याची संधी मला मिळाली. मधल्या अनेक वर्षांत गोगो काकांनी केलेले काम, बालकांना, पालकांना व समाजाला दिलेले कर्तृत्वरूपी सहकार्य समजून घेता आले. गोगो काकांचे त्यांच्या आयुष्यातले उपक्रम जाणून घेऊन त्यामधून खूप शिकण्यासारखे आहे. मध्यंतरी गोगो काकांनी लिहिलेली ‘चाॅकलेट बुक सिरीज’ हे खिशात मावणारं सोळा पानांचं पुस्तक केवळ एक रूपयाला एक अशी सीरिज प्रसिद्ध झाली. यात ‘जंगलाची कथा’, ‘डूरवं’, ‘सशाचा लॅपटाॅप’, ‘झिपर्या’, ‘वन’, ‘शहाणा बबलू’ यांचा समावेश आहे. या पाच पुस्तकांच्या एक लाख पंचवीस हजार प्रति विकल्या गेल्या हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
५ मार्च २०२३ या त्यांच्या सत्त्याहत्तराव्या वाढदिवसादिनी त्यांचे शंभरावे पुस्तक प्रकाशित झाले. हा त्यांच्या लेखनकलेतला स्वप्नपूर्तीतील परमोच्च क्षण. गोगो काकांचे प्रेरणास्थान म्हणजे त्यांची थोरली मोठी बहीण आक्का ऊर्फ श्यामला गोपाळ जोग ही आहे. आक्काचे आताचे वय नव्वद वर्षे आहे. तिनं आपल्या भावाला गोष्टं कशी लिहायची, संवाद कसे लिहायचे ते शिकविले. तसेच गोगोंची आई उमाबाई महेश्वर यांनी गोगोंना खूप मोठ्या लोकांची कीर्तने ऐकविली. ती गोगोंना व त्यांच्या बहिणीला बार्शी येथे भगवंताच्या देवळात घेऊन जायची. तेव्हा आफळेकर बुवा, निजामपूरकर बुवा अशा कितीतरी लोकांची कीर्तनं त्यांनी ऐकली. त्यातली दिंडी, ओवी, साकी, श्लोक, कटाव आणि कीर्तनकारांच्या संवादफेक व निरूपण यांचा गोविंद यांच्या मनावर खूप ठसा उमटला. त्याचा परिणाम त्यांच्या बालनाट्य, कविता-कथा यात दिसतो.
गोगो काका आपल्या वाचनविषयक आवडीबद्दल सांगतात, सोलापुरात ते पाचवी ते आठवी या शालेय वर्षात होते. तिथे त्यांचे काका, कृष्णाजी गोविंद गोडबोले हे प्राथमिक शिक्षक होते. गोगो काकांचा त्यांच्याकडे मुक्काम असायचा. कारण त्यांच्याकडे बाल साहित्याच्या पुस्तकांचा खजिना होता. त्यांनी संपूर्ण सानेगुरूजींचं साहित्य, ना. धो. ताम्हणकर यांची पुस्तकं वाचली. चांदोबाचा पहिला अंक त्यांनी तिथेच वाचला. आपल्या कुटुंबाबद्दल मनमोकळेपणाने सांगताना गोगो काका म्हणतात, “आमची घरची आर्थिक परिस्थिती बरी असल्याने फारसे अडचणीचे प्रसंग कधी आले नाहीत. आई-वडिलांचे संस्कार व मार्गदर्शन यामुळे उत्तम नियोजन करता आले. वर्षाचं धान्य एकदम घेणं, दर महिन्याला बचत करणं यामुळं कधी धर्मसंकट उभे राहिले नाही. बायकोही काटकसरीने घर चालवित होती. त्यामुळे आजही मी चार पैसे जवळ बाळगून आहे.”
ते उच्चविद्याविभूषित असून त्यांनी एम. ए., बी. एड., बी. जे. सी., एम. जे. सी. व ग्रामीण पत्रकारिता असे शिक्षण पूर्ण केले आहे. गोगो काकांच्या लेखनाची सुरुवात खरं तर ‘गोगो गोष्टी’ या पुस्तकाने झाली आहे. त्यांच्या या पुस्तकाला राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘आचार्यमध्याचार्य’, ‘भगतसिंग’ ही त्यांनी मुलांसाठी लिहिलेली चरित्रे राष्ट्रभक्ती, शौर्य, तेजस्वीपणा या गुणांचे दर्शन घडवितात. मुलांसाठी कथा लिहिताना अनेकदा सकारात्मक कल्पनाशक्तीचा वापर करणे जरूरीचे असते. त्यातून मुलांवर घडणारे चांगले संस्कार महत्त्वपूर्ण ठरतात. ‘पपेट शो’ हे देखील मुलांमध्ये योग्य संदेश देणारे माध्यम आहे.
बालनाटकांमधून बालकलाकारांना अभिनय करण्याची संधी मिळते, यातून भावी कलाकार तर घडतातच, शिवाय बालपिढीची देखील चांगले काय-वाईट काय हे समजण्याची क्षमता वाढते. शालेय रंगभूमीवर त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून गोगो काकांची कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र प्राप्त नाटकं म्हणजे ‘खेळण्यांची करामत’, ‘रिटर्न गिफ्ट’, ‘गोष्टीची गोष्टं’ , ‘अंतराळातला स्वर्ग’, ‘सुतावरून स्वर्गाला’, ‘आदिम’, ‘न्याय हवा न्याय’, बालन्यायालयात लाटणे काकू’ इ. कथाकथन, कार्यशाळा, व्याखानं यासाठी गोगो काकांनी महाराष्ट्रभर भटकंती केली. आकाशवाणीवर त्यांनी अनेक नवनवीन, उपयुक्त विषयांवर कार्यक्रम घेतले. गोगो काकांच्या प्राणीकथा मुलांमध्ये भरपूर वाचल्या जातात. त्यांचे ‘जंगल्यातल्या गोष्टी’ हे बालकथांचे पुस्तक विशेष गाजले.
प्राण्यांच्या माध्यमातून त्यांच्या कथा साहस, भीती, नीती, चांगले-वाईट इ. ची जाणीव करून देतात. गोगो काकांचा कोल्हा, ससा, वाघ, सिंह, माकड अशा जंगली प्राण्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यामुळे प्राण्यांसंदर्भातल्या त्यांच्या गोष्टीत उत्सुकता व विविध भावना निर्माण होतात. साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या अनमोल कार्याबद्दल आजवर त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. ‘विदर्भ साहित्य संघ नाट्य समिती’- नागपूर, ‘मुक्त संवाद साहित्यिक समिती’- इंदूर, ‘बाल रंगभूमी परिषद’ – मुंबई, ‘राष्ट्रीय स्तरावरील विशेष सन्मान’ असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. गोगो काकांच्या ‘गोलू आणि पाऊस’, ‘सरपंचाची मुलगी’, ‘वाढदिवस’, ‘झुबकी’, ‘वनकथा’ अशा पुस्तकांतून मुलांच्या मनात पर्यावरणविषयक प्रेम रुजते. त्यांची ‘किट्टी’, ‘अंधार ढोली’, ‘गुप्तहेर’ ही पुस्तके गुढं जगताची ओळख करून देतात.
मुलांत मूल होऊन जगण्यासाठी मनही तितकेच निरागस, निर्मळ लागते. असे मन गोगो काकांकडे असल्यामुळे ते अधिक सहजतेने या क्षेत्रात सहजतेने कार्यरत आहेत. मुलांसाठी आपुलकीने काम करीत राहणे हे त्यांचे ऊर्जास्थान आहे. आपणही कधीतरी गोगो काकांना जरूर भेटा. एका निखळ आनंदाची अनुभूती आपणास जरूर येईल.