Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सहंसाबाईंचा पुन्हा आविष्कार : सांगत्ये ऐका

हंसाबाईंचा पुन्हा आविष्कार : सांगत्ये ऐका

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

मराठी साहित्यात लोकप्रिय असलेल्या कादंबरी आणि प्रवास वर्णनांपाठोपाठ वाचला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे आत्मचरित्र. त्यातही ते एखाद्या सेलिब्रिटीचे असेल तर वाचक, आवृत्त्यांवर आवृत्या संपवत असतात. ‘सांगत्ये ऐका’बाबत हेच झाले. मुळात १३१ आठवडे चाललेल्या या चित्रपटाची पार्श्वभूमी तशी ग्लॅमरसच होती. हंसा वाडकरांची यात असलेली भूमिका फार काही उल्लेखनीय नव्हती, मात्र त्यांची ती फसवणूक होती, अशा काहिशा खळबळजनक विधानांमुळे ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्राला बाजारपेठ मिळून गेली. मला मुळात आत्मचरित्र वाचायला आवडत नाहीत. कारण खरं-खोटं करत बसायला मला जमत नाही. जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्रा’ऐवजी या पुस्तकात आत्मचरित्रांची केलेली पोलखोल मला अधिक पटते, रुचते आणि भावते. तर अशा या बहुचर्चित अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावरचे इनमिन ६८ पानांचे ‘सांगत्ये ऐका’ आजही बेस्टसेलर कॅटेगरीत मोडते. त्यावर आधीच एक ‘भूमिका’ नामक सेलिब्रिटींची मांदियाळी असलेला चित्रपट गाजून गेलाय. अशातच विश्वास सोहोनी दिग्दर्शित आणि मानसी कुलकर्णी अभिनित ‘सांगत्ये ऐका’ हे एकलनाट्य रंगभूमीवर प्रदर्शित झाले आहे.

तसं बघायला गेलं, तर प्रथम पुरूषी एक वचनी लेखन शैलीमुळे एकलनाट्य सादर करताना, थेट त्या आत्मचरित्राच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करता येतो. परकाया प्रवेश वगैरे म्हणतात, ते हेच काहिसे असावे. त्यामुळे प्रेक्षकांना मानसी कुलकर्णींनाच हंसा वाडकर मानण्यावाचून गत्यंतर नसते. मग तो प्रवास हंसा वाडकरांच्या ठरावीक वयापासून ठरावीक वयोमानापर्यंतचाच पाहणे अनिवार्य ठरते. जेव्हा एखादी रंगावृत्ती सादर करण्याचे धाडस एखादा दिग्दर्शक करतो, तेव्हा त्या आत्मचरित्रातले केवळ प्रसंग इनॅक्ट करून न घेता, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून हंसा वाडकरांचे काही तरी म्हणणे असेल ना? जे चिंतनशील असू शकते, कदाचित ते म्हणणे आत्मचरित्रात नसेलही; परंतु त्या व्यक्तिरेखेद्वारे कळणे गरजेचे आहे. त्यामुळे सादर होणारी संहिता एडिट केलेली ६८ पाने न राहता, त्या पलीकडे हंसाबाईंचे व्यक्तित्व दर्शवणारी हवी होती, असे सारखे वाटत राहते. विश्वास सोहोनी हा माझ्या पिढीचा आवडता दिग्दर्शक. अगदी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांपासून ते समांतर, व्यावसायिक अशा सर्व नाट्य प्रकारांत त्याने केलेली मुशाफिरी ही उल्लेखनीयच आहे परंतु सादरीकरणाचीही एक वृत्ती असते. ती सुरुवातीपासूनच मीडियाॅकर का असते? किंवा असते का? याचा मी सातत्याने विचार करत असतो.

मग उत्तर मिळते की, यशाचे गणित साधण्यासाठी किंवा प्रेक्षक माझे म्हणणे स्वीकारतील की नाही ?… अशा दोलायमान अवस्थेमुळे ‘सेफ खेळण्याची’ वृत्ती मला आजवर विश्वास सोहोनीच्या प्रेझेंटेशन्स मध्ये दिसून आलीय. बेधडक वृत्तीचे अ‍ॅबसर्ड किंवा अतिवास्तववादी प्रायोगिक (सरिअलिस्टिक एक्सपरिमेंटल) प्रकारांची शक्यता त्याने कधी पूर्णार्थाने हाताळली नाही. हाताळावी, अशी इच्छा मात्र आहे. कारण त्याची शैली फारच आक्रमक आहे, तो स्वतंत्रपणे निर्णय घेत नाटके दिग्दर्शित करतो; मात्र मुळात त्या नाटकांची निवड करते वेळी, मीडीऑकर विचारांना तो बळी पडतं असावा का ? आजच्या या निरीक्षणात मी दिग्दर्शकीय मनोविश्लेषणाचा एक पैलू संदर्भ म्हणून मांडलाय. इतर दिग्दर्शकांच्या बाबतीत तो मी मांडू इच्छित नाही, कारण विश्वास सोहोनीच्या आणि इतर दिग्दर्शकांच्या सृजनशीलतेमध्ये फार तफावत आढळते. असो. तर सांगायचा मुद्दा असा की ‘सांगत्ये ऐका’ हे एकूणच वेगळेपणा दाखवणाऱ्या दिग्दर्शकीय मूल्यांचे नाटक म्हणून उभे करता आले असते; पण ते तसे काहीच वेगळेपण सांगतही नाही आणि दाखवतही नाही. नाटक सुबक आहे, प्रेक्षणीय आहे म्हणून नेटके आहे.

मानसी कुलकर्णींना या अगोदर विविध भूमिकांमधून पाहिलेले आहे. त्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारची ही व्यक्तिरेखा आहे, म्हटले तर अत्यंत कठीण अशी तारेवरची कसरत म्हणजे सांगत्ये ऐकाची हंसा वाडकर आहे. या आत्मकथनांमध्ये ‘व्यथां’चे प्रमाण जास्त झाल्याने, नाटकाचा बाज हा कारुण्याकडे झुकला आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सात्त्विक गुण प्रदर्शनासाठी ही जमेची बाजू असते आणि कथानकाच्या आनुषंगाने येणारे भावोत्कट प्रसंगावर मानसी कुलकर्णींनी नक्कीच बाजी मारली आहे. फक्त हंसा वाडकरांचे मान वेळावणे, मुरके मारणे, ओठांच्या-भुवयांच्या हालचाली, उत्कट नखरेलपणा थोडा अधिक गडद झाला असता, तर काळ (पीरीयड) उभा राहण्यास थोडी अधिक मदत झाली असती. मात्र या अभिनेत्रीची आॅडियन्स होल्ड करायच्या ताकदिला सॅल्युट करायलाच हवा.

बऱ्या वर्षांनी नंदलाल रेळेंच पार्श्वसंगीत अनुभवता आले. हौशी रंगकर्मींसाठी नंदलाल रेळे हा नटेश्वराने पृथ्वीतलावर पाठवलेला एक देवदूत आहे. त्याने दिलेले म्युझिक पिसेस आमच्या एकांकिकांच्या अंगाखांद्यावर खेळले आणि त्या नाट्यकृतींनी कित्येकांना मोठे करून गेल्या, ज्याला कारणीभूत नंदलाल रेळे होता. अनेक वर्षांनंतर ‘आविष्कार’ या संस्थेने अनन्यसाधारण व विलक्षण बुद्धिमत्तेचे तीन रंगकर्मी एकत्र आणून जी त्रिवेणी घडवलीय, तो आविष्कार म्हणजे
‘सांगत्ये ऐका.’

सौजन्य : संजय पेठे
दिग्दर्शक : विश्वास सोहोनी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -