Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यझाडे लावा, जीवन वाचवा

झाडे लावा, जीवन वाचवा

उन्हाळ्यात आपणा सर्वांना ४५ डिग्रीपेक्षा जास्त तापमानाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. त्यावेळी आपली मानसिक अवस्था काय झाली होती याचा प्रत्येकांनी विचार करावा. याचे एकमेव कारण होते ते म्हणजे औद्योगिकीकरणाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल. त्याचबरोबर नवीन झाडे लावली पाहिजेत. घोषणा होतात, मात्र नंतर त्या घोषणांचे काय होते हे देशातील सर्वसाधारण जनतेला माहिती असते. तेव्हा आता जनतेनेच अशा गोष्टींमध्ये सतर्क राहाणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावीत असतात याची जनजागृती करावी लागेल. त्यासाठी ‘आला पावसाळा, चला झाडे लावूया’ अशा घोषणांनी लोकांना झाडे लावण्याची जाणीव करून दिली पाहिजे. तेव्हा आपले सर्वांचे जीवन वाचविण्यासाठी चला तर पावसाळा सुरू झाला. सर्वांना संजीवनी मिळण्यासाठी झाडे लावूया तरच आपले जीवन वाचवू शकतो.

रवींद्र तांबे

हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला असे आपणा सर्वांना वाटत असते. तेव्हा कोकणात आल्यावर असे शालू पाहायला मिळतात. त्यामुळे मनाचे खूप समाधान होते. कारण आपण निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची आपल्याला जाणीव होते. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्या प्रमाणात वृक्षारोपण होत नाही. त्यामुळे आज ‘झाडे लावा, जीवन वाचवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशातील जनतेला आवाहन केले की, आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे याची पण सर्वांना माहिती आहे.

देशात विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जातात. मात्र त्या प्रमाणात झाडांची लागवड केली जात नाही. तेव्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक वर्षी पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी जनजागृती करून झाडे लावली पाहिजेत. त्याचप्रमाणे झाडांचे संगोपन केले पाहिजे तरच आपले जीवन वाचवू शकतो. तेव्हा आजच्या घडीला झाडे लावणे गरजेचे झाले आहे. एक वेळ आपल्या परिसरातील डोंगर झाडांच्या हिरव्यागार पानांनी सजलेले दिसत होते. आज त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी असताना दिसतात. याचा परिणाम दिवसेंदिवस जंगलतोड होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तेव्हा सुजाण नागरिकांनी उंच इमारतीत राहाणे पसंत जरी केले तरी किमान एक व्यक्ती एक झाड दर वर्षी लावणे स्वत:च्या तसेच देशाच्या हितासाठी गरजेचे आहे. म्हणजे दर वर्षी देशात १०० कोटीपेक्षा जास्त झाडे लावू शकतो. हा महत्त्वाचा संकल्प सन २०२४ पासून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशी घोषणा करून चालणार नाही तर प्रत्यक्षपणे कृती करणे गरजेचे आहे. जेव्हा शासकीय अनुदानातून वृक्षारोपण करीत असतो तेव्हा अनुदान फुकट जाणार नाही याची काळजी वनविभागाला घ्यावी लागेल. त्यासाठी प्रथम जमिनीचे क्षेत्र निवडावे लागेल. उन्हाळ्यात दोन ते तीन वर्षे झाडांना पाणी घालण्यासाठी जवळपास नदी-नाले असणे आवश्यक आहे. वाडीत व गावातील मोकळ्या जागेत तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करण्यात यावी तसे अगोदर मोकळ्या जागेचे सर्वेक्षण शासनाच्या वतीने करण्यात यावे. म्हणजे पावसाळ्यात झाडे लावणे सोयीचे होईल.

सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी कडक उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला झाडांची आठवण आली असेल. तेव्हा गाजावाजा न करता किमान ‘एक व्यक्ती, एक झाड’ या तत्त्वाचा अवलंब करून या वर्षीपासून झाडे लावूया. त्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीने डोळ्यांसमोर ध्येय्य ठेवूया. यातच आपले सर्वांचे कल्याण आहे. दरवर्षी झाडे लावा, झाडे जगवाचा नारा देतो. मात्र यातील किती झाडे जगवतो याचा प्रामाणिकपणे विचार होणे आवश्यक आहे. पाहा ना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी रुपये एक हजार कोटी खर्च करण्यात आले. याची सुरुवात १ जुलै, २०१९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आनंदवनमध्ये वनमहोत्सव साजरा करून १ जुलै, २०१९ ते ३० सप्टेंबर, २०१९ या तीन महिन्यांत झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यावेळी ‘एकच लक्ष, लावू ३३ कोटी वृक्ष’ अशा गर्जना सुद्धा झाल्या. आता यातील किती झाडे जगली आहेत याचा वनमहोत्सव साजरा करणाऱ्या वनविभागाने घोषित करणे आवश्यक आहे. कारण ही झाडे लावण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाचा आर्थिक सहभाग आहे. याची जाणीव राज्यातील प्रत्येक नागरिकांना झाली पाहिजे. तरच शासकीय अनुदानाचा योग्य प्रकारे वापर होईल.

राज्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मात्र त्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत नाही. झाडे लावली जातात ती सुद्धा कार्यक्रमापुरते त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा पारा चढू लागला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. याचा पण विचार देशातील नागरिकांनी करणे गरजेचे आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून औद्योगिक बदल घडणे गरजेचे असते. याचा अर्थ असा नव्हे की, झाडांचा नायनाट करणे. तेव्हा दरवर्षी प्रत्येकांनी न विसरता आपल्या परिसरात पावसाळ्यात झाड लावलेच पाहिजे असा संकल्प करुया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -