काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नाशिक : नाशिकच्या (Nashik news) सिडको परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता दुसऱ्या माळ्यावरील बाल्कनीतून पडला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा परिसरात ही घटना घडली. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करिम शेख (वय २ वर्ष) असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
करिम हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. त्यावेळी करिमची आई घरकामात होती. दरम्यान, गॅलरीत खेळत असलेला करिम खेळता खेळता अचानक रेलिंगवर पकडून उभा राहिला. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळला. काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले. करिम जखमी अवस्थेत पडल्याचे दिसताच नागरिकांनी ताबडतोब त्याला उचलून हॉस्पिटल गाठले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.