नागपूर : केरळ (Keral) राज्यातून आलेल्या कॅन्सर (Cancer) पीडित पत्नीच्या उपचारासाठी एक कुटुंब नागपूर शहरात (Nagpur News) दाखल झाले होते. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात पीडित महिलेच्या उपचारादरम्यान पैशांची कमी भासल्याने पतीने त्याच्या मुलीसह स्वतःचा व पत्नीचा जीव घेण्याचा टोकाचा पाऊल उचलला. यामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाला. मात्र मुलीचा थोडक्यात बचाव झाला असून तिच्यावर इंदिरा गांधी (मेयो) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व प्रकारमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे (Jaripatka Police Station) हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली आहे. केरळ येथील पीडित महिला प्रिया नायर (३४) ही रक्ताच्या कर्करोग आजाराने ग्रासली होती. उपचारासाठी तिला नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात आणले होते. महागडे रुग्णालय असल्यामुळे दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च होत होता. मध्यम वर्गीय परिस्थिती असल्यामुळे पीडित महिलेचा पती रीजु नायर (४५) हे आर्थिक संकटात सापडले होते. उधार घेतलेले पैसेही संपल्यानंतर त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार निर्माण झाला होता. अशातच उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेण्यासाठी पैसे शिल्लक नसल्यामुळे रीजु नायर यांनी पत्नी आणि मुलीला शीतपेयातून विष दिले. त्यानंतर स्वतः ही विषयुक्त शीतपेय घेवून आत्महत्या केली. परंतु यात रीजु नायर यांची १२ वर्षीय मुलीचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
नेमके काय घडले?
रीजु नायर यांनी पत्नी प्रियाला शीतपेयामध्ये विष घालून पिण्यासाठी दिले. त्यानंतर तेच शीतपेय १२ वर्षीय मुलगी वैष्णवीला दिल्यानंतर स्वतःही विष घेतले. वैष्णवीने ते शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळात तिने उलट्या केल्या, त्यामुळे तिच्या पोटात गेलेले विष बाहेर पडले आणि ती थोडक्यात बचावली. सध्या तिच्यावर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. परंतु या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण रुग्णालय हादरुन गेले आहे.